तुळजाभवानी नवरात्रोत्सवही आता राज्याचा प्रमुख महोत्सव

मुंबई, दि. १६ : कोल्हापुरातील शाही दसर्यानंतर आता तुळजापुरातील तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रौत्सवाचा महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवात समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार त्याठिकाणी येत्या नवरात्रौत्सवात घटस्थापनेपासून दसर्यापर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. राज्याच्या पर्यटन विभागाने याबाबतचे परिपत्रक जारी केले.
या राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे तुळजापुरमध्ये (Tuljapur)धार्मिक विधीबरोबरच राष्ट्रीय व प्रादेशिक पातळीवरील सुप्रसिध्द कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम, प्रबोधनपत्र कार्यक्रम, भव्य लोकसंगीत मैफल, ३०० ड्रोनद्वारे नवरात्र थीम लाईट शो, चित्रकलेसह व्याख्याने तसेच मॅरेथॉन आणि फॅम टूर्सचे तसेच पर्यटन विषयक मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
प्रसिध्द म्हैसूर दसरा महोत्सवाची प्रसिध्दी कन्नड व इंग्रजी या दोन्ही भाषेत केल्यामुळे देशी-विदेशी पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. याच धर्तीवर तुळजापुरातील सर्व उपक्रमांची प्रसिध्दीदेखील मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांत करण्यात येणार आहे. तसेच यंदाच्या नवरात्रीत स्थानिक लोककला, लोकनृत्ये, आई अंबाबाईचे गोंधळी गीत, भारुड, जाखडी, भजन स्पर्धा, कीर्तनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय पर्यटन विभागाने घेतला आहे. महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या संकेतस्थळासह यूट्यूब चॅनेलवर त्याचे प्रक्षेपण केले जाणार आहे.