भारतीय वायूदलात आहे लढाऊ विमाने व वैमानिकांची कमतरता
नवी दिल्ली, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : युद्धजन्य परिस्थितीत अत्यंत निर्णायक भूमिका बजावणाऱ्या भारतीय हवाई दलात (IAF) लढाऊ विमाने आणि वैमानिकांची कमतरता आहे. सरकारकडे 114 लढाऊ विमाने खरेदी करण्याचा करार प्रलंबित आहे. हवाई दलाने एचएएलला 83 तेजस मार्क-1ए बनवण्याचे कंत्राट दिले आहे, परंतु अमेरिकन कंपनीकडून इंजिन पाठवण्यास उशीर झाल्यामुळे 2028 पर्यंतच पुरवठा लांबणीवर पडला आहे. 2016 ते 2021 या कालावधीत 222 प्रशिक्षणार्थी वैमानिकांची भरती करण्याची योजना होती, परंतु हवाई दल हे लक्ष्य पूर्ण करू शकले नाही, असे कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
भारतीय हवाई दलात 4.5 जनरेशन जेटची कमतरता आहे. या पिढीतील 1.25 लाख कोटी रुपयांची 114 लढाऊ विमाने खरेदी करण्याचा प्रकल्प सरकारकडे प्रलंबित आहे. त्यापैकी काही विमाने परदेशातून आणली जातील आणि उर्वरितांसाठी समिती देशातच उत्पादन सुचवू शकते. ही जेट विमाने चीनच्या सीमेवर तैनात करण्याची सरकारची योजना आहे.
केंद्र सरकारने संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. ही समिती गरजा लक्षात घेऊन जुन्या-नव्या प्रकल्पांवर लक्ष ठेवणार आहे.
या समितीमध्ये संरक्षण सचिव (उत्पादन) संजीव कुमार, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) प्रमुख डॉ. समीर व्ही. कामत आणि हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल टी. सिंह यांचा समावेश आहे. ही समिती दोन ते तीन महिन्यांत आपला अहवाल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना सादर करणार आहे.
SL/ML/SL
23 Dec. 2024