शांततेचे नोबेल मिळवण्यासाठी ट्रम्प यांचा हट्ट

वॉशिंग्टन डीसी, दि. १ : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवण्यासाठी जोरदार दावा केला आहे. त्यांनी सात युद्धे थांबवल्याचा दावा करत, “मला शांततेचा नोबेल पुरस्कार दिला नाही, तर तो अमेरिकेचा अपमान ठरेल,” असे जाहीर वक्तव्य केले. गाझा येथे शांतता प्रस्थापित करण्याच्या त्यांच्या योजनेवर त्यांनी विशेष भर दिला असून, इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष संपवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यांच्या २०-कलमी गाझा शांतता आराखड्याला इस्रायल आणि अनेक अरब राष्ट्रांनी समर्थन दिले असून, हमासने तो नाकारल्यास कठीण परिस्थिती निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला.ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान संघर्षात मध्यस्थी केल्याचा पुनरुच्चार करत, “या दोन आण्विक शक्तींमधील तणाव मी कमी केला,” असा दावा केला. त्यांनी सांगितले की, अमेरिकेसोबतचा व्यापार थांबवण्याची धमकी दिल्यामुळे चार दिवसांत संघर्ष संपला. पाकिस्तानचे सैन्यप्रमुख असीम मुनीर यांनीही ट्रम्प यांच्या भूमिकेचे कौतुक केल्याचे त्यांनी नमूद केले.नोबेल पुरस्कारासाठी ट्रम्प यांनी अनेक देशांवर दबाव टाकला होता. भारताकडेही त्यांच्या नावाची शिफारस करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. मात्र भारताच्या परराष्ट्र खात्याने हा दावा फेटाळला असून, भारताने त्यांच्या नावाची शिफारस केली नाही, यामुळे ट्रम्प नाराज झाले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी नोबेलसाठीच्या दंड बैठका थांबवल्याचेही वृत्त समोर आले आहे. CBS न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, “मला पुरस्कार नको, मी केवळ लोकांचे प्राण वाचवू इच्छितो,” असे म्हणत त्यांनी आपली भूमिका बदलल्याचे संकेत दिले.नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा १० ऑक्टोबर रोजी नॉर्वेतील नोबेल समितीकडून होणार आहे. याआधी चार अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना हा पुरस्कार मिळालेला आहे, ज्यामध्ये ट्रम्प यांचे राजकीय प्रतिस्पर्धी बराक ओबामा यांचाही समावेश आहे. ट्रम्प यांचा हट्ट, त्यांचे दावे आणि बदललेली भूमिका यामुळे जागतिक राजकारणात चर्चेचा विषय निर्माण झाला आहे.
SL/ML/SL1 Oct. 2025