ट्रम्प-मस्क यांच्यात जोरदार खडाजंगी

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व टेस्ला आणि ‘स्पेसएक्स’चे सीईओ एलॉन मस्क यांच्यात सध्या जोरदार खडाखडी सुरू आहे. मस्क यांनी ट्रम्प यांच्याविरोधात उघड भूमिका घेतली आहे, तर एलॉन मस्क यांचे डोके फिरले आहे, अशी टीका डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.
‘व्हाइट हाऊस’च्या अधिकाऱ्यांनी वाद संपवण्यासाठी ट्रम्प व मस्क यांच्यात शुक्रवारी बैठक ठेवली होती. जेव्हा या बैठकीबाबत ट्रम्प यांना विचारणा केली असता त्यांनी मस्क यांना भेटण्यास नकार दिला.
मस्क यांनी दावा केला की, तांत्रिक व्यासपीठ व जनतेवरील प्रभावाशिवाय ट्रम्प हे निवडणूक जिंकू शकले नसते. मी ट्रम्प यांचे समर्थन केले नसते तर रिपब्लिकन पक्षाला सिनेटमध्ये बहुमत मिळाले नसते, असेही ते म्हणाले. तर ट्रम्प हे मान्य करण्यास तयार नाहीत. ट्रम्प म्हणाले की, मी मस्क यांच्याशिवायही जिंकलो असतो. आता त्यांच्या अहंकाराच्या अंताची वेळ झाली.
मस्क यांना दिल्या जाणाऱ्या सरकारी कंत्राटांचा पुनर्विचार करू
मस्क यांच्या कंपन्यांना सरकारकडून दिले जाणारे अब्जावधी डॉलरचे अनुदान व कंत्राटांचा पुनर्विचार करू. हे अनुदान आतापर्यंत बायडेन यांनी बंद का केले नाही, हे मला समजत नाही. आम्ही फालतू खर्च बंद करून देशाचा अर्थसंकल्प वाचवू शकतो.
या वादाची सुरुवात ही ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटीफूल विधेयका’वरून झाली. यामुळे कर व खर्च सुधारणांमध्ये बदल होईल. या विधेयकात विजेच्या वाहनांवरील करात कपात केली आहे. त्यामुळे मस्क यांची कंपनी ‘टेस्ला’ला फायदा होणार आहे. पण, मस्क यांनी हे विधेयक अनावश्यक असल्याचे सांगितले व ट्रम्प यांना पदावरून हटवावे, अशी मागणी त्यांनी केली.