ट्रम्प आता पैसे देऊन ग्रीनलँड विकत घेण्याच्या तयारीत

 ट्रम्प आता पैसे देऊन ग्रीनलँड विकत घेण्याच्या तयारीत

वॉशिग्टंन डीसी, दि. १२ : जगभरातील नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध भाग येनकेन प्रकारणे ताब्यात घेण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. व्हेनेझुएलावर कारवाई करून झाल्यावर आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ग्रीनलँड खरेदी करण्याची तयारी दाखवली आहे. व्हाईट हाऊसने जाहीर केले आहे की या आर्क्टिक प्रदेशावर नियंत्रण मिळवण्यासाठी आर्थिक व्यवहारासोबतच लष्करी पर्यायही विचारात घेतला जात आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की जर अमेरिकेने पुढाकार घेतला नाही तर रशिया किंवा चीन ग्रीनलँडवर ताबा मिळवतील, आणि ते अमेरिकेला मान्य नाही.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे अधिकारी ग्रीनलँडमधील नागरिकांसाठी एका खास आर्थिक पॅकेजवर विचार करत आहेत. या योजनेनुसार, ग्रीनलँड डेन्मार्कपासून वेगळे होऊन अमेरिकेत सामील झाले, तर तिथल्या प्रत्येक रहिवाशाला एकरकमी मोठी रक्कम दिली जाऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही रक्कम प्रति व्यक्ती 10,000 डॉलर ते 1,00,000 डॉलर इतकी असू शकते. भारतीय चलनात विचार केला तर ही रक्कम साधारणपणे 10 लाख रुपये ते 1 कोटी रुपयांच्या घरात जाते. मात्र, ही रक्कम नक्की किती असेल आणि ती कशी दिली जाईल, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही.

ट्रम्प यांनी पूर्वी व्हेनेझुएलामध्ये हस्तक्षेप करून त्याच्या अध्यक्षावर कारवाई केली होती. त्यानंतर आता ग्रीनलँडवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी म्हटले आहे की “ग्रीनलँडबाबत आम्ही काहीतरी निर्णय करणारच, मग ते विकत घेऊन किंवा लष्करी मार्गाने”.डेनमार्क व ग्रीनलँडचे नेते मात्र स्पष्टपणे सांगतात की ग्रीनलँड विक्रीसाठी नाही. ट्रम्प यांचे मत आहे की ग्रीनलँड अमेरिकेचे ५१वे राज्य बनू शकते, ज्यामुळे अमेरिकेला आर्क्टिकमध्ये कायमस्वरूपी सामरिक व आर्थिक फायदा मिळेल.

ट्रम्प यांच्या या महत्त्वाकांक्षेला डेन्मार्क आणि ग्रीनलँड या दोन्ही सरकारांनी जोरदार विरोध केला आहे. ग्रीनलँड हे विक्रीसाठी उपलब्ध नाही, असे त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे. ग्रीनलँडमध्ये 1979 पासून स्वशासन लागू आहे, तरीही ते डेन्मार्कचा एक भाग मानले जातात.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *