संतोष देशमुख हत्या प्रकरणात तिहेरी चौकशी सुरू, तपासाला वेग

मुंबई दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येतील उर्वरित आरोपींना तातडीने अटक करून या प्रकरणाची चार्जशीट लवकरात लवकर तयार करून हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवले जावे, तसेच या घटनेतील सर्व दोषी आरोपींना फाशीची शिक्षा दिली जावी ही मागणी मी अगदी सुरुवातीपासून करत आलो आहे. या प्रकरणात आता सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन अशी तिहेरी चौकशी सुरू असून तपासाला वेग आल्याचेही दिसत आहे, असे मत मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर धनंजय मुंडे हे माध्यमांशी संवाद साधत होते. हत्येतील प्रत्येक दोषी आरोपीला फासावर लटकवले जावे ही माझ्यासह सर्वपक्षीय नेत्यांची मागणी आहे. मात्र त्या आडून मला मंत्रिपदावर ठेवायचे नाही असे म्हणणाऱ्या जिल्ह्यातील काही नेत्यांना तसे का वाटते हे त्यांनाच विचारले पाहिजे, असेही धनंजय मुंडे यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले आहे.
दरम्यान सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन अशा तीन प्रकारची चौकशी सुरू असल्याने यावरती कोणत्याही राजकीय नेत्याचा कुठल्याही प्रकारचा प्रभाव पडायची काहीही सुतराम शक्यता नसते. याची जाणीव सर्वच लोकप्रतिनिधींना असायला हवी. बाकी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाला द्यायचे याबाबत आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यासह पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असेही यावेळी धनंजय मुंडे म्हणाले.
ML/ML/SL
2 Jan. 2025