या राज्यात आदिवासींनी उभारली कंपनी
चेन्नई, दि. १६ : तामिळनाडूतील निलगिरीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या १०० हून अधिक आदिवासी गावांनी एकत्र येऊन आदिमलाई ही कंपनी स्थापन केली आहे. कंपनीने महिलांच्या सहभागावर विशेष लक्ष दिले आहे. कंपनीच्या 60 कर्मचाऱ्यांपैकी 52 महिला आहेत. ही कंपनी नीलगिरीतील अनेक गावांना जोडून काम करत आहे. यात एकूण 1,809 भागधारक आहेत. यापैकी बहुतेक ग्रामीण आणि आदिवासी समुदायातील आहेत, ज्यात सुमारे निम्म्या महिला आहेत. कंपनीच्या गावांमध्ये असलेल्या प्रक्रिया केंद्रांमध्ये मध, आवळा, जांभूळ, कॉफी, बाजरी, काळी मिरी आणि जंगलातून मिळणाऱ्या इतर वस्तू सुकवल्या जातात, पॅक केल्या जातात आणि साठवल्या जातात.
आदिवासी आवळा, शिकेकाई, कॉफी, मध आणि जंगलातून मिळणाऱ्या इतर नैसर्गिक वस्तू गोळा करतात आणि कंपनीमार्फत शहरांमध्ये विकतात.
या कंपनीशी या गावांचे १० हजारांहून अधिक लोक जोडले गेले आहेत. यामध्ये त्यांना कीस्टोन फाउंडेशनने मदत केली. २०१३ मध्ये आदिमलाई पझंगुडियिनार प्रोड्यूसर कंपनी लि. ची स्थापना झाली, जी येथील आदिवासी ग्रामीण स्वतः चालवतात. याची उलाढाल १.४ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
शेतकरी आणि जंगलातून उत्पादने गोळा करणारे लोक आपला माल कंपनीला देतात, त्यानंतर कंपनी त्यावर प्रक्रिया करून बाजारात पोहोचवते. किंमत ठरवण्यासाठी नियमित बैठकांमध्ये विविध क्षेत्रांचे प्रतिनिधी सहभागी होतात. वस्तूची किंमत बाजारापेक्षा किमान 20% जास्त ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.