पोलिस भरतीमध्ये आदिवासी तरुणांना उंचीत मिळणार सूट
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काटक आणि कणखर शरीरयष्टी असूनही उंची कमी भरल्यामुळे राज्यातील आदिवासी युवकांना अनेकदा पोलीस भरतीला मुकावे लागते. यावर ठोस उपाययोजना करत आता राज्य शासनाने आदिवासी युवकांना पोलीस भरतीमध्ये आवश्यक उंचीमध्ये काहीशी सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. उंचीमुळे आदिवासी तरुणांची होणारी कोंडी आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली होती. केंद्राप्रमाणेच महाराष्ट्रातील पदभरतीमध्ये आदिवासींना उंचीच्या निकषात ५ सेंटिमीटरची सूट द्यावी, अशी मागणी लावून धरली होती.
याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने नियमात सुधारणा केली आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे, ‘महाराष्ट्र पोलिस शिपाई सेवाप्रवेश नियम २०११ व महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बलातील सशस्त्र पोलिस शिपाई (पुरुष) सेवाप्रवेश सुधारणा नियम २०१२’ यात आणखी सुधारणा करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयाबाबत समाधान व्यक्त करत केळापूर-आर्णी चे आमदार डॉ. संदीप धुर्वे म्हणाले, केंद्र सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाने भारतीय पोलिस सेवा, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स व अन्य सेवेत शारीरिक क्षमता चाचणीत आदिवासींना ५ सेंटिमीटरची सूट दिलेली आहे. राज्यात ही सूट नव्हती. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही सूट देऊन राज्यातील आदिवासी समाजाला न्याय दिला आहे. आदिवासी उमेदवारांनी आता या संधीचा लाभ घ्यावा.
या नियमाला आता ‘महाराष्ट्र पोलिस शिपाई सेवाप्रवेश (सुधारणा) नियम २०२४’ असे संबोधल्या जाणार आहे. त्यानुसार जे आदिवासी उमेदवार आवश्यक पात्रता शर्तीची पूर्तता करतात, त्यांना उंचीमध्ये ५ सेंटिमीटरची शिथिलता देण्यात आलेली आहे. राज्य सरकारच्या या सकारात्मक निर्णयामुळे आदिवासी उमेदवारांची पोलिस भरतीची वाट सुलभ झाली आहे.
SL/ML/SL
9 Oct. 2024