पालघरमध्ये आदिवासी महिलेची ३ लाखांना विक्री, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
पालघर, दि. ७ : काही वर्षांपूर्वीच ठाणे जिल्ह्यातून वेगळा झालेल्या आदिवासीबहुल पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार पालघर जिल्ह्यात पोलिसांनी लग्नाच्या बहाण्याने २० वर्षीय आदिवासी महिलेला ३ लाख रुपयांना विकल्याच्या आणि तिचा छळ केल्याच्या आरोपावरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती आज एका अधिकाऱ्याने दिली.
कातकरी समाजाच्या या महिलेने आरोप केला आहे की, मे २०२४ मध्ये तिला नाशिकच्या एका व्यक्तीशी लग्न करण्यास भाग पाडण्यात आले. एफआयआरनुसार, त्या व्यक्तीने आणि त्याच्या आईने दोन दलालांना ३ लाख रुपये दिले, ज्यांनी नंतर त्या तरुणीची मानवी तस्करी केली आणि तिच्या लग्नाची सोय केली, असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. तक्रारदार महिलेने म्हटलं आहे की, पती तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता तसंच वारंवार जातीवाचक शिवीगाळही करायचा. गरोदर असतानाही पतीने मारहाण केली होती. इतकंच नव्हे तर तिला वेळेवर जेवणही दिलं जात नव्हतं.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, बाळाच्या जन्मानंतर महिला जून 2025 रोजी आपल्या आईच्या घरी परतली. 6 जानेवारी रोजी आरोपीने तिचे बाळ पळवून नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. प्रकरण अधिक गंभीर झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
SL/ML/SL