पर्यटकांसाठी नवे आकर्षण जिजामाता उद्यानातील क्रोक ट्रेल सुरु
मुंबई, दि.8( एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईतील जिजामाता उद्यानात येणाऱ्या पर्यटक आणि मुलांसाठी उद्यानातील ‘क्रॉक ट्रेल’ म्हणजेच मगर आणि सुसर साठीचे मोठे तळे पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे उद्यानात येण्याऱ्या पर्यटकांना मगर आणि सुसर पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. पालिकेतर्फे राणी बागेत विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून नवनवीन प्राण्यांचा समावेश झाल्यानंतर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यातच आता जलचर आणि उभयचर प्राण्यांचेही दर्शन पर्यटकांना होत आहे. उद्यानातील ‘क्रॉक ट्रेल’मध्ये तीन मगर आणि दोन सुसर सोडण्यात आले आहेत. प्रशासनाने या तळ्यात मगरींसाठी आणि सुसरसाठी दोन वेगवेगळे भाग तयार केले आहेत. त्यामुळे पर्यटकांना एकाचवेळी दोन्ही प्राणी पाहण्याचा आनंद घेता येत आहे. तसेच पाण्यात पहुडलेल्या मगर आणि सुसर पर्यटक तळयाकाठी बनवलेल्या ‘डेक’वरूनही पाहू शकतात. तसेच या प्राण्यांच्या पाण्याखालील हालचाली देखील पर्यटक टीपू शकतात. उन्हाळ्यात मुंबई, महाराष्ट्रासह इतर राज्यातून तसेच परदेशातील पर्यटकही भेट देत असतात . सध्या उद्यानात वाघ, बिबट्या पेंग्विन,अस्वल हे प्राणीदेखील पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहेत. आणखी एक खास आकर्षण म्हणजे पाणपक्ष्यांसाठीचा पिंजरा. या पिंजऱ्यात पर्यटकांना स्वत: आत जाता येते. पिंजऱ्यात गेल्यावर आपल्या चोहीबाजूला पक्षी नजरेस पडतात. त्यामुळे आपण पक्ष्यांच्याच घरट्यात शिरल्याची अनुभूती पर्यटक घेत आहेत. प्राणी संग्रहालयात वाघांसाठी तयार केलेल्या काचेच्या ‘व्ह्युविंग गॅलरी’प्रमाणे दर्शनी भाग बनवण्यात आला आहे. मगरीसाठी १५०० स्क्वेअर मीटर जागा अंदाजित करून ही गॅलरी बनवण्यात आली आहे. यामध्ये जाऊन पर्यटक ‘अंडर वॉटर’ आणि ‘डेक व्ह्युविंग’ पद्धतीने मगरी, सुसरी पाहण्याचा आनंद घेत आहेत. सध्या या ठिकाणी असणाऱ्या मगरी, सुसरींना विविध प्रकारचे मांसाहारी खाद्य देण्यात येत आहे. शनिवार, रविवारी राणी बागेत पर्यटकांची प्रचंड गर्दी वाढत आहे. आठवड्याच्या अखेरीस शनिवारी आणि रविवारी तब्बल ३३ ते ३५ हजार पर्यटक उद्यानात येतात. तसेच सोमवार ते शुक्रवारपर्यंत दररोज २० ते २२ हजार पर्यटकयेत आहेत .
ML/KA/PGB 3 May 2023