राज्यातील पहिलं तृतीयपंथीयांचं गोविंदा पथक दहीहंडीसाठी सज्ज
पुणे, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कृष्णजन्माष्टमीचा उत्सव अगदी दोन दिवसांवर आल्यामुळे राज्यात सर्वत्र गोविंदा पथकांची जोरदार तयारी सुरु आहे. सर्वांना संघटीत करणाऱ्या या सणाच्या निमित्ताने यावर्षी एक पुरोगामी उपक्रम सुरू होत आहे. आता पुण्यामध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्रातील तृतीयपंथी गोविंदा पथकं तयार होत आहे. यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच तृतीय पंथीयांच गोविंदा पथक यंदाच्या दहीहंडीत सहभागी होणार आहे. तृतीयपंथीयांचा सहभाग असलेले १०० जणांचे तब्बल चार संघ हे पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये तयार करण्यात आले असून त्यांनी कसुन सरावालाही सुरुवात केली आहे. प्रत्येक संघात २५ तृतीयपंथीय सदस्यांचा सहभाग असणार आहे.
येत्या सात सप्टेंबरला पुण्यातील नारायण पेठेतील गोगटे प्रशालेच्या मैदानावर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दहीहंडी फोडण्यात येणार आहे. ‘दीपस्तंभ’चे विश्वस्त आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर, सामाजिक कार्यकर्त्यां शर्वरी गावंडे आणि शिवप्रताप संस्था यांच्या माध्यमांतून तृतीयपंथी यांच्या दहीहंडीचे विशेष आयोजन करण्यात आले आहे.
“समाजातील प्रत्येक घटकाला जगण्याचा अधिकार आहे.त्याप्रमाणे तृतीयपंथी यांना देखील आहे. आज तृतीयपंथी विविध क्षेत्रात काम करताना दिसत आहे. ही चांगली बाब असून समाजाने त्यांना आपल्या कुटुंबातील व्यक्ती प्रमाणे स्वीकारले पाहिजे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही यंदा प्रथमच तृतीयपंथी यांचे गोविंदा पथक तयार करण्याचा निर्णय घेतला आणि त्या कामाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.जवळपास १०० तृतीयपंथी एकत्रित आले असून आता हे सर्व सात सप्टेंबर रोजी दहीहंडी फोडण्यास सज्ज झाले आहे.यामधून समाजाला एक संदेश जाण्यास मदत होणार आहे” अशी प्रतिक्रिया दीपक मानकर यांनी यावेळी दिली.
ML/KA/SL
4 Sept. 2023