पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीवरील मल्लखांबाचे प्रशिक्षण

 पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीवरील मल्लखांबाचे प्रशिक्षण

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दोरीवरील मल्लखांबाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. धारावी येथील महानगरपालिकेच्या दोन शाळांमध्ये यासाठी प्रथमदर्शी प्रकल्प हाती घेण्यात आला असून १८ ते ३० एप्रिल दरम्यान दोरीवरील मल्लखांब शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. Training of rope walkers to municipal school students

या शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र शासनाच्या वतीने श्रीशिवछत्रपती पुरस्कार, दादोजी कोंडदेव पुरस्कार तसेच जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ क्रीडापटू आणि प्रशिक्षक उदय देशपांडे यांच्या हस्ते नुकतेच झाले. याप्रसंगी क्रीडा उपविभागाचे वरिष्ठ पर्यवेक्षक राजेश गाडगे, प्रशासकीय अधिकारी (शाळा) स्नेहलता डुमरे, क्रीडा पर्यवेक्षक दत्तू लवटे, कनिष्ठ पर्यवेक्षक कुनील सोनवणे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास व्हावा आणि मल्लखांब क्षेत्रात त्यांना रुची निर्माण व्हावी, या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दोरीवरील मल्लखांबाचे (रोप मल्लखांब) प्रशिक्षण देण्याचा उपक्रम शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ व शिक्षण अधिकारी राजू तडवी यांच्या नेतृत्वात हाती घेण्यात आला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील क्रीडा उपविभागाकडून राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी दादर येथील समर्थ व्यायाम मंदिराचे सहकार्य लाभले आहे. धारावी भागातील टीसी मनपा शाळा आणि संत कंकय्या मार्ग या दोन्ही शाळांमध्ये दोरीवरील मल्लखांब प्रशिक्षणाचा पथदर्शी प्रकल्प राबवला जात असून त्या अंतर्गत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी दोन्ही शाळांमधील इंग्रजी, हिंदी, उर्दू, मराठी तसेच तमिळ माध्यमाच्या तिसरी आणि चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या १४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांतून ८० विद्यार्थ्यांची पुढील प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार आहे.
त्यानंतर दर आठवड्यात सोमवार ते गुरुवारी सकाळी १० ते ११.३० वाजेदरम्यान वर्षभराच्या कालावधीसाठी समर्थ व्यायाम मंदिराचे प्रशिक्षक या विद्यार्थ्यांना दोरीवरील मल्लखांबाचे मोफत प्रशिक्षण देतील. उर्वरित काळात शाळेतील शारीरिक शिक्षक या विद्यार्थ्यांचा सराव करून घेतील. दोरीवरील मल्लखांबसाठी लागणारे सर्व साहित्य बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती क्रीडा उपविभागाचे वरिष्ठ पर्यवेक्षक राजेश गाडगे यांनी दिली आहे.

ML/KA/PGB
20 Apr 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *