शाळेतच मिळतेय सेंद्रीय शेती कसण्याचे प्रशिक्षण
जालना, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ग्रामीण भागातील शाळेचे शिक्षक आणि पालकांच्या समन्वयातूनच शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने शेती कसण्याचे धडे जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातील दहीफळ भोंगाने पूर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना दिले जात आहेत.
या शाळेच्या आवारातील परसबागेत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलं सेंद्रिय भाजीपाला पिकवित असून, त्याचा शालेय पोषण आहारातही वापर केला जात आहे हे विशेष. या जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवित आहेत.
त्यांच्या अभिनव उपक्रमाची जिल्ह्यातच नव्हे तर राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रातही दखल घेण्यात आली आहे.उपक्रमशील शिक्षक पेंटू म्हैसनवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी या शाळेचा चेहेरा मोहरा बदलून टाकला आहे.पहिली ते चौथीचे वर्ग असलेल्या या शाळेची पटसंख्या मात्र २९ पण वर्गातला अभ्यास वेळेत संपवून मग मुलांना शेतीची आवड निर्माण व्हावी यासाठी म्हैसनवाड सरांनी मागील ४ वर्षांपासून शाळेच्या परिसरातील दोन गुंठे जागेत पारसबाग तयार केली आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांना शनिवार, रविवार अभ्यास संपल्या नंतरच्या वेळेत भाजीपाला लागवड,त्याची जोपासना, उत्पादन या विषयांवर माहिती देत मुलांना सोबत घेऊन परसबागेतील खुपरणी,भाजीपाल्यास पाणी देण्याचे कामही म्हैसनवाड सर करतात.
त्यामुळे शाळकरी मुलांना सेंद्रिय शेती कसण्याची आवड निर्माण झाली आहे. शालेय मुलांचा उत्साह पाहून पालक,शालेय समितीचे पदाधिकारी, सदस्यही शाळेच्या विविध उपक्रमात सहभागी होत असून सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे मुलांची गुणवत्ता वाढण्यास मोठी मदत होत आहे.
पारसबागेत भाजीपाला लागवड ते काढणीपर्यंतची कामे शालेय विद्यार्थी करतात. भाजीपाला लागवड, खुरपणी, ठिबकद्वारे पाणी देणे, भाजीपाला तोडणे, कमी पाण्यात भाजीपाला घेण्यासाठी मुलं प्रयत्न करतात.
मुलांना ज्ञानदान करण्यासोबतच त्यांना सेंद्रिय शेती कसण्याची माहिती मिळावी,यासाठी पारसबागेत मार्गदर्शन केले जाते.मुलंही आवडीने या उपक्रमात सहभागी होत असून, शाळेच्या उपक्रमाला ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळत असल्याचे पेंटू म्हैसनवाड सर अभिमानाने सांगतात.
शाळेच्या परिसरात पडणारा कचरा संकलित करून कम्पोष्ट खताची निर्मिती इथे केली जाते.हेच खत परसबागेतील भाजीपाल्याला दिले जाते.
शिवाय गावातून शेणखत घेऊन तेही भाजीपाल्याला दिले जाते.या पारसबागेत ऋतुनुसार भाजीपाला पिकविला जातो.सेंद्रिय पद्धतीने पिकविल्या जाणाऱ्या भाजीपाल्याचा वापर मुलांच्या शालेय पोषण आहारात दैनंदिन केला जातो त्यामुळे मुलांना सेंद्रिय भाजीपाला आहारातून प्राप्त होत आहे.
ML/KA/SL
16 Jan. 2023