तब्बल १४ महिन्यानंतर गगनबावडा घाटातून वाहतूक सुरू

सिंधुदुर्ग दि २५–जिल्ह्याला कोल्हापूरला जोडणारा वैभववाडी गगनबावडा घाट तब्बल 14 महिने बंद होता. या गटात दुरुस्ती काम हाती घेण्यात आले होते .या घाटात आता एकेरी वाहतूक तब्बल 14 महिन्यानंतर सुरू करण्यात आली आहे. नूतनीकरणासाठी हा घाट 22 जानेवारी 2024 पासून पूर्णपणे बंद करण्यात आला होता. घाट बंद असल्याने या मार्गावरून नियमित येजा करणाऱ्या वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.
त्याचबरोबर वैभववाडी तळेरे ,नांदगाव या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांवर देखील गंभीर परिणाम झाला होता. अनेक वेळा घाटातील कामांचा आढावा घेत घाट सुरू होण्याबाबत प्रशासनाकडून वारंवार केवळ तारखा दिल्या जात होत्या. स्थानिक आमदार नितेश राणे यांनी मंत्रीपद स्वीकारल्यानंतर सर्वात प्रथम या घाटाची पाहणी केली होती आणि सुरक्षतेची सर्व खबरदारी घेऊनच वाहतूक सुरू करण्याचे आदेश दिले होते .सध्या काही दिवस या घाटमार्गातून वैभववाडी कडून कोल्हापूर कडे जाणारी अशी एकेरी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 15 मार्च नंतर आढावा घेऊन दोन्ही बाजूने वाहतूक सुरू करण्याचा निर्णय देण्यात येईल असे प्रशासनाने कळवले आहे.