सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य द्या…

 सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य द्या…

ठाणे, ता. २५ नोव्हेंबर २०२५

मुंबईच्या वेशीवरील ठाणे शहराची ओळख नजीकच्या काळात वाहतुक कोंडीचे शहर म्हणून होऊ लागल्याने ही चिंतेची बाब आहे. या कोंडीला रस्त्यांची दुरावस्था व अन्य बाबी कारणीभुत असल्या तरी, ठाणे शहरातील वाहनांची वाढती संख्यादेखील वाहतुक कोंडीचे कारण ठरत आहेत. साधारणतः १८ लाख लोकसंख्येच्या ठाण्यात आजघडीला तब्बल साडेसोळा लाख वाहने आहेत. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे मत ठाणे शहर वाहतुक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी व्यक्त केले आहे.
मुंबई पाठोपाठ वेगाने विकसीत होत असलेल्या ठाणे शहराची लोकसंख्या १८ लाखांच्या घरात आहे. तर दळवळणासाठी सुमारे ३८० किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचे रस्ते आहेत. यामध्ये पुर्वद्रुतगती महामार्ग, मुंबई – नाशिक राष्ट्रीय महामार्ग तसेच वर्दळीच्या घोडबंदर रोडचा समावेश होतो. ठाणे शहरांतर्गत असलेले अनेक जुने रस्ते अपुरे आणि अरुंद आहेत. त्यात पार्किगची सुविधा उपलब्ध नसल्याने सर्रास रस्त्यांवरच वाहने पार्क केली जातात. याशिवाय कामावर जाणारे चाकरमानी आणि उद्योग व्यवसायाकरीता शहरात येणारी जड – अवजड व्यावसायिक वाहने देखील रस्त्यांवर मिळेल त्या जागेत तासनतास उभी केली जातात. जुन्या ठाण्यात तर पार्किगची समस्या गहन आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यांवरील वाहतुक कोंडीची झळ अंतर्गत शहरालाही बसते. अनेक छोट्या इमारतींचा पुर्नविकास होऊन मोठमोठे टॉवर उभे राहात आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षात लोकसंख्ये सोबतच वाहनांच्या संख्येत देखील पाचपट वाढ झाल्याचे दिसुन येत आहे. शहरातील अन्य मुख्य रस्ते व घोडबंदर रोडवर ठाणे महापालिका, मेट्रो आदी विविध प्राधिकरणांमार्फत सुरू असलेल्या विकासकामांमुळे आणि अनेकदा होणाऱ्या अपघात – दुर्घटनांच्या घटनांमुळे वारंवार अडथळे उद्भवून वाहतुक खोळंबून पडते. अशा सर्व अडचणींना सामोरे जात ठाणे शहर वाहतुक विभाग उपलब्ध मनुष्यबळाच्या आणि ट्राफिक वॉर्डनच्या सोबतीने रस्त्यांवर अविरत कार्यरत आहे. परंतु, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतुक नियमन करताना वाहतुक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदणी केलेल्या वाहनांची संख्या पाहता ठाण्यातील प्रती माणशी एक वाहन अशी परिस्थिती दिसुन येत आहे. यात २ लाख ७८ हजार ट्रान्सपोर्ट वाहनांची संख्या असुन नॉन ट्रान्सपोर्ट वाहनांची संख्या १३ लाख ७२ हजार ६७९ इतकी आहे. अशा प्रकारे दिवसागणीक वाहने वाढत असुन आजघडीला १६ लाख ५१ हजार ३८४ वाहने ठाण्यात धावत आहेत. या वाहनांव्यतिरिक्त १५ वर्षे कालावधी संपलेली बेकायदा वाहनेही उदंड आहेत. त्यामुळे अपुरी रस्ते सुविधा आणि वाढत्या वाहनसंख्येमुळे भविष्यात ही कोंडी आपल्या घरापर्यत पोहचण्याची भीती आहे.

ठाणे प्रादेशिक परिवहन विभागातील नोंदीनुसार

‘टी’ परमीट कॅब – ३९,६५८ वाहने
पीकअप टेंपो – १,३८,१६२
रुग्णवाहिका – १,११२
ऑटो रिक्षा – ८९,०४७
दुचाकी – १०,४२,३०७
चारचाकी – ३१५९८५

“ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तुलनेने रस्ते व पायाभूत सुविधा अपुऱ्या आहेत. यामुळे वाहतुक कोंडी बरोबरच धुळ व हवा प्रदुषणाची समस्या देखील वाढत आहे. त्यामुळे नागरीकांनी खाजगी वाहनांचा वापर कमी करून दैनंदिन जीवनात सार्वजनिक वाहतुक सेवेचा उपयोग केल्यास या समस्या काही अंशी कमी होण्यास मदत होईल.”
-. पंकज शिरसाट, उपायुक्त वाहतुक शाखा, ठाणे शहर*. AG/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *