महाराष्ट्रातील पर्यटनस्थळाला मिळाला युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि पाचगणी या प्रसिद्ध थंड हवेच्या पर्यटनस्थळांना युनेस्कोने जागतिक नैसर्गिक वारसा स्थळाचा दर्जा बहाल केला आहे. 17 सप्टेंबर 2025 रोजी युनेस्कोच्या भारतातील स्थायी समितीने अधिकृत घोषणा करत या दोन्ही स्थळांचा समावेश जागतिक नैसर्गिक स्थळांच्या यादीत केला. यापूर्वी कास पठार, प्रतापगड, कोयना अभयारण्य यांना हा दर्जा मिळाला होता, आणि आता महाबळेश्वर–पाचगणीच्या समावेशामुळे महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील जैवविविधतेला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे.
महाबळेश्वर आणि पाचगणी हे 1985 मध्ये केंद्र सरकारने घोषित केलेल्या कोयना अभयारण्याचा भाग आहेत. या परिसरात घनदाट जंगल, थंड आणि स्वच्छ हवामान, तसेच अनेक दुर्मिळ वनस्पती आणि प्राणीप्रजाती आढळतात. विशेष म्हणजे, हा भाग फ्लड बॅसॉल्ट ज्वालामुखीच्या भूगर्भीय रचनेसाठी प्रसिद्ध आहे आणि पृथ्वीच्या इतिहासातील ‘क्रेटेशस–इपेलिओजिन वंशविनाश’ घटनेशी संबंधित असल्याचे भूशास्त्रज्ञ मानतात.
या सन्मानामुळे महाबळेश्वर–पाचगणी केवळ पर्यटनस्थळ म्हणून नव्हे, तर पर्यावरणीय आणि शैक्षणिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे ठिकाण ठरणार आहे. यामुळे या भागातील जैवविविधतेचे संरक्षण, पर्यावरणीय संवर्धन आणि शाश्वत पर्यटनाला चालना मिळेल. साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले की, युनेस्कोच्या मान्यतेमुळे या परिसराला जागतिक ओळख मिळाली असून, भविष्यातील संशोधन आणि पर्यावरणीय धोरणांसाठी हे एक आदर्श उदाहरण ठरेल.
महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर महाबळेश्वर–पाचगणी हे ठिकाण आता सोनेरी अक्षरांनी कोरले गेले आहे. हा सन्मान राज्यासाठी अभिमानास्पद असून, स्थानिक प्रशासन आणि पर्यावरणप्रेमींनी याचे स्वागत केले आहे.