गेट वे ऑफ इंडिया येथे लाइट ॲण्ड साऊंड शो
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्य शासनाचा पर्यटन विभाग, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यातर्फे भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि ब्रिटिश सैन्य दलाच्या भारतातील माघारीला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मंगळवार २८ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता गेट वे ऑफ इंडिया येथे लाइट ॲण्ड साऊंड शोचे आयेाजन करण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज दिली.
कार्यक्रमाचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
लोढा यांनी सांगितले, देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून लाइट ॲण्ड साऊंड शोला २८ फेब्रुवारी पासून सुरुवात करण्यात येत आहे. प्रथम आठवड्यातून दोन वेळेस म्हणजे शनिवारी आणि रविवारी शो होईल. शो आझादी का अमृत महोत्सव’ आणि प्रगतीशील भारत संकल्पनेवर आधारित आहे. तसेच स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान यावरही या शोच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात येणार आहे.
उदघाटन सोहळ्यास विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार अरविंद सावंत, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय,इंडियन ऑइलचे अध्यक्ष श्रीकांत माधव वैद्य, इंडियन ऑइलचे निदेशक (विपणन) व्ही. सतीश कुमार यांची प्रमुख उपस्थिती राहील.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अभिनव असा उपक्रम सुरू होत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील यांनी आवाहन केले आहे.Tourism Minister Mangalprabhat Lodha
ML/KA/PGB
26 Feb. 2023