समुद्री व्यापार आणि प्राचीन भारत

मुंबई, दि. 5 (जाई वैशंपायन) : सागरसफरी आणि सागरी व्यापार या संकल्पना प्राचीन भारताला सुपरिचित होत्या. लोथल येथे सापडलेल्या सिंधू संस्कृतीच्या खाणाखुणा आणि प्राचीन काळी अनेक देशांत पोहोचलेल्या भारतीय वस्तू त्याची साक्ष देतात. प्राचीन भारताचा सागरी व्यापार दक्षिण अमेरिकेतील देशांशी चाले. इजिप्तच्या ज्या बंदरात थांबून या नौका पुढे जात, तेथे संशोधनात काळे मिरे सापडले. हे भारताचेच वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन होते. तेथे पहिल्या शतकातील रेशमी वस्त्रेही मिळाली. ‘सिल्क रूटच्या’ आधीपासून हा ‘स्पाइस रूट’ प्रसिद्ध होता. भारतावरील आक्रमणांदरम्यान भस्मसात झालेल्या विद्यापीठांत इतर अनेक शास्त्रांबरोबरच जहाजबांधणी हा विषयही शिकवला जाई.
मार्को पोलो (१२५४-१३२४) याने लिहिलेल्या ‘मार्व्हल्स ऑफ द वर्ल्ड’ या ग्रंथात, ‘भारतात निर्माण झालेली जहाजे दीर्घकाळ टिकतात, त्यांना दीर्घकाळपर्यंत दुरुस्तीची गरज पडत नाही’- असे नोंदवून ठेवले आहे ! ब्रिटिश जहाजांचे मात्र तसे नव्हते. साहजिकच, पारतंत्र्याच्या काळात, भारतीय जहाजांमुळे ब्रिटिश जहाजांची मागणी घटली. यावर उपाय म्हणून राणीला हुकुमनामा काढावा लागला होता. मात्र युरोपीय दर्यावर्दी लोकांच्या साहसाचे कौतुक शिकल्यावर आपणच आपले कर्तृत्व विसरलो, हेच खरे ! फार काय, वास्को-द- गामा यालाही भारताकडे येण्याचा सागरी रस्ता एका भारतीय व्यापाऱ्यानेच दाखवला होता आणि त्या व्यापाऱ्याकडे भलेमोठे अत्याधुनिक जहाज होते, हे आपल्या गावीही नसते ! मध्यंतरीचा बराचसा काळ आक्रमणांच्या आणि गुलामीच्या पर्वात गेला असला तरी, भारतीयांनी आपली जहाजबांधणीची कला आणि सागरी व्यापाराचे कौशल्य गमावले नव्हते, हेच यातून दिसते.
विसावे शतक -:
ईस्ट इंडिया कंपनीने व्यापाराच्या निमित्ताने येऊन टप्प्याटप्प्याने जवळपास साऱ्या देशाचे राजकारण ताब्यात घेतले आणि अर्थकारण गिळंकृत केले, हे सर्वज्ञात आहेच. मात्र काही ठिकाणी उद्योजकतेचे स्फुल्लिंग तेवत होते. समुद्री व्यापारात नाणावलेल्या चोल साम्राज्याचा वारसा सांगणाऱ्या तमिळनाडूतील कंपनीचे नाव येथे घ्यावेच लागेल. १९०६-१९११ या काळात चिदंबरम पिल्लै यांच्या ‘स्वदेशी स्टीम नॅव्हिगेशन कंपनीने’ सागरी व्यापारात जम बसवण्याचा प्रयत्न केला. BISNC या ब्रिटिश कंपनीशी थेट स्पर्धा पुकारल्याने, सत्ताधाऱ्यांनी साम-दाम-दंड-भेद असे सर्व मार्ग वापरून, पिल्लै यांच्या स्वदेशी कंपनीला परास्त केले. मात्र भारतीय गप्प बसणार नव्हते.
पहिल्या जागतिक महायुद्धानंतर देशात पुन्हा एकदा देशभक्तीचे आणि आर्थिक सक्षमतेच्या उत्साहाचे वारे वाहू लागले. यावेळी ‘सिंदिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनी’ हे नाव या क्षेत्रात चर्चेत होते. ग्वाल्हेरचे महाराजा माधवराव सिंदिया यांचे ‘लॉयल्टी’ नावाचे प्रवासी जहाज त्यांना विकायचे असल्याची माहिती १९१९ मध्ये उद्योजक वालचंद हिराचंद यांना समजली. सिंदिया यांना अपेक्षित किंमत होती- २५ लाख रुपये, त्यातही अर्धी रक्कम ताबडतोब चुकती करण्याची अट होती. वालचंद यांना सागरी क्षेत्रात अनुभव नसला तरी, व्यावसायिक दूरदृष्टी होती. त्यांनी बॉंबे प्रांतातील कापड व्यापारी नरोत्तम मोरारजी यांच्याशी भागीदारी करून लगेचच एक कंपनी स्थापन केली. साडेचार कोटींच्या भांडवलानिशी २७ मार्च १९१९ ला ‘सिंदिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनी’ स्थापन झाली. या कंपनीचेच ‘लॉयल्टी’ हे जहाज ५ एप्रिल १९१९ या दिवशी बॉंबेहून लंडनकडे मार्गस्थ झाले. तोच हा आपला राष्ट्रीय सागरी दिवस!
अर्थात, ‘लॉयल्टी’लाही इंग्रजनिर्मित वादळांमधूनच प्रवास करावा लागला. १४ मे या दिवशी इंग्लंडला पोहोचलेल्या या भारतीय जहाजाला परतीच्या प्रवासासाठी प्रवासी आणि माल मिळू नये, यासाठी ब्रिटिशांनी हरप्रकारे धडपड केली. परंतु वालचंद आणि नरोत्तम यांनीही इरेला पेटून प्रयत्न सुरू ठेवले. लंडनमध्ये एजन्सी स्थापन करून काही प्रवासी मिळवले आणि भारतात वापरण्यासाठी दीड हजार टन पिग आयर्न /कच्चे लोखंडही घेतले. ते सर्व त्या जहाजावर लादले आणि शेवटी १ नोव्हेंबर १९१९ ला लॉयल्टीने लंडन सोडले. अशा खडतर अनुभवानंतरही या नौकेच्या आणखी काही फेऱ्या झाल्या.
उद्योजकतेवरील ‘निष्ठा’-:
‘लॉयल्टी’च्या उद्योगामध्ये तोटा सोसूनही वालचंद हिराचंद आणि नरोत्तम मोरारजी या जोडगोळीने त्यातून धडा घेऊन चिवटपणे व्यवसाय सुरू ठेवला. जहाजांचा ताफा उभारावा लागेल आणि मालवाहू जहाजांवर भर द्यावा लागेल, हे ओळखून पावले उचलली. त्यांचा पराभव करण्यासाठी ब्रिटिशांनी पुन्हा काही क्लृप्त्या लढवल्या. या शह-काटशहाच्या खेळाला पुढे राजकीय नेतृत्वाची जोडही मिळाली, आणि पूर्वसूरींनी ‘निष्ठेने’ सुरू ठेवलेली लढाई यशस्वी झाली. यथावकाश भारत स्वतंत्र झाला आणि सागर सफरी आणि समुद्री व्यापार नव्या दिशेने सुरू झाला.
आम्ही चालवू हा पुढे वारसा-:
नरोत्तम यांच्या निधनानंतर त्यांच्या स्नुषा- सुमती मोरारजी यांनी सिंदिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनीच्या संचालकपदाची आणि १९४८ मध्ये अध्यक्षपदाची धुरा पेलली. १९७० मध्ये त्या लंडनमधील जागतिक नौवहन महासंघाच्या उपाध्यक्षपदी निवडून आल्या. तेथपासून ते भारतातील मर्चंट नेव्हीच्या पहिल्या महिला – कॅप्टन राधिका मेनन- यांच्यापर्यंत आणि तेथून पुढे आजही अनेक स्त्रिया या क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे जात आहेत.
आज –
आज हिंदी महासागरातील आपल्या स्थानाचे महत्त्व ओळखून, जागतिक सागरी व्यापारात भारत आगेकूच करत आहे. छत्रपती शिवरायांच्या आरमारातून प्रेरणा घेणाऱ्या भारतीय नौदलाच्या नेतृत्वाखाली, सागरी सुरक्षेचेही नवे मापदंड जगासमोर स्थापित करत आहे.
‘शाश्वत नौवहन- संधी आणि आह्वाने’ ही यावर्षी सागरी दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. अर्थात, भारताला पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून नावारूपाला आणण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या सागरी व्यापार क्षेत्राने, शाश्वत विकासाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला दीर्घकाळ बळकटी देत राहावे, असा यामागचा उद्देश आहे.
Today is April 5. National Maritime Day. On that occasion –
JW/ML/PGB
5 Apr 2024