टायटॅनिक पर्यटन पाणबुडी गायब
वॉशिंग्टन,दि.२० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाश्चिमात्य लोक कुतूहल आणि जिज्ञासेपोटी अनेकदा जीव धोक्यात घालताना दिसून येतात.याचाच प्रत्यय देणारी नुकतीच घडलेली घटना म्हणजे टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी लोकांना घेऊन जाणारी पाणबुडी अटलांटिक महासागरात बेपत्ता झाली आहे. पाणबुडीचा माग काढण्यासाठी शोध आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.
छोट्या पाणबुड्या अधूनमधून पर्यटकांना आणि तज्ञांना टायटॅनिकचा नाश पाहण्यासाठी घेऊन जातात. त्यासाठी पैसे घेतले जातात. टायटॅनिकच्या अवशेषापर्यंतच्या प्रवासासाठी हजारो डॉलर खर्च येतो. टायटॅनिकला पोहोचायला आणि परतायला आठ तास लागतात.टायटॅनिकचे अवशेष अटलांटिक महासागराच्या 3,800 मीटर (12,500 फूट) खाली आहे. हे जहाज न्यूफाउंडलँड, कॅनडाच्या किनाऱ्यापासून सुमारे 600 किमी (370 मैल) अंतरावर आहे.
बेपत्ता झालेल्या पाणबुडीत ब्रिटनचे अब्जाधीश उद्योगपती हामिश हार्डिंग (वय ५८) यांच्यासह पाकिस्तानचे अब्जाधीश उद्योगपती शहजादा दाऊद (वय ४८) आणि त्यांचा मुलगा सुलेमान (वय १९) हे देखील आहेत. या तीन पर्यटकांशिवाय एक पायलट आणि एक कंटेंट एक्सपर्ट असे एकूण पाच लोक आहेत. यांच्या पाणबुडीनं न्यूफाऊंडलँडच्या सेंट जॉन्स इथून पाण्यात डुबकी लावली. त्यानंतर टायटॅनिकच्या अवशेषांपर्यंत पोहोचून पुन्हा परत समुद्राबाहेर येण्साठी आठ तासांचा कालावधी लागतो.
अमेरिकेच्या कोस्टगार्डचे रिअर अॅडमिरल जॉन मॉगर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितलं की, बेपत्ता झालेल्या पाणबुडीला शोधण्यासाठी आमच्याकडं ७० ते ९६ तासांचा अवधी आहे. या पाणबुडीच्या शोधासाठी दोन विमानं आणि एक पाणबुडी तसेच सोनारनं सज्ज असलेले बांध पेरण्यात आले आहेत. ज्या भागात ही शोध मोहिम सुरु आहे ती खूपच दूर असल्यानं या मोहिमेत अडथळे येत आहेत.
बेपत्ता झालेली पाणबुडी ओशियन गेट कंपनीची असून ती टायटन सबमर्सिबल आहे जो एका ट्रक एवढ्या आकाराची आहे. यामध्ये पाच लोक बसू शकतात. सर्वसामान्यपणे या पाणबुडीत बिकट परिस्थितीत चार दिवस पुरेल इतका ऑक्सिजन ठेवलेला असतो.
टायटॅनिकची जलसमाधी
जगातील सर्वात वाईट दुर्घटना म्हणजे टायटॅनिक जहाजाला मिळालेली जलसमाधी. या घटनेवर टायटॅनिक या नावानंच काही वर्षांपूर्वी हॉलिवूडमध्ये सिनेमा येऊन गेला ज्यानं ऑस्कर पुरस्कारावर मोहोरही उमटवली. तेव्हापासून या महाकाय टायटॅनिक जहाजाबाबत जगभरातील लोकांमध्ये मोठं कुतुहल आहे. टायटॅनिक, त्याच्या काळातील सर्वात मोठे जहाज, 15 एप्रिल 1912 रोजी साउथॅम्प्टन (इंग्लंड) ते न्यू यॉर्कच्या पहिल्या प्रवासाला निघाले आणि एका हिमखंडावर आदळले. जहाजावरील 2,200 प्रवासी आणि क्रू पैकी 1,500 हून अधिक ठार झाले. 1985 मध्ये समुद्रात त्याचा अवशेष सापडला होता. तेव्हापासून, त्याचा व्यापक शोध घेण्यात आला.
SL/KA/SL
20 June 2023