टिपू सुलतान वादावरून
पुण्यात भाजप आणि काँग्रेस आमनेसामने
पुणे दि १५ : शहरातील काँग्रेस भवनाबाहेर रविवारी भारतीय जनता पार्टी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हंगामा झाला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना केल्याचा कथित आरोप करण्यात आल्याने हा वाद निर्माण झाला.
या विधानाच्या निषेधार्थ भाजपाच्या पुणे शहर युनिटकडून काँग्रेस भवनाबाहेर आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. घोषणाबाजीदरम्यान धक्काबुक्की, किरकोळ दगडफेकही झाली.
प्रत्यक्षदर्शींनुसार, सुरुवातीला भाजप कार्यकर्ते काँग्रेस भवनाकडे गेले. त्यास प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस कार्यकर्तेही बाहेर आले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी सुरू झाली आणि धक्काबुक्की झाली. या गोंधळात किरकोळ दगडफेकीची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
या दगडफेकीत तिघेजण किरकोळ जखमी झाल्याची माहिती असून त्यांना प्राथमिक उपचार देण्यात आले आहेत.
दोन्ही पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप
भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी आरोप केला की काँग्रेस कार्यकर्त्यांनी दगडफेक करून भाजप कार्यकर्त्यांना लक्ष्य केले. हा प्रकार पूर्वनियोजित असल्याचा गंभीर आरोप त्यांनी काँग्रेसवर केला. तर काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद सावंत यांनी प्रतिउत्तर देताना सांगितले की, पोलिसांना आधीच माहिती देण्यात आली होती. तरीही भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाकडे कूच करत गोंधळ घातला. भाजप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.
पोलिस ठाण्याबाहेर काँग्रेसचे आंदोलन
घटनेनंतर काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते फरासखाना पोलीस ठाणे येथे दाखल झाले आणि भाजपविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले. शहर काँग्रेसचे अनेक विद्यमान व माजी पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पुणे पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि दोन्ही बाजूंशी चर्चा केली. सध्या पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.ML/ML/MS