नव्या पिढीला साहित्याची नव्याने ओळख करून देण्याची वेळ
मुंबई, दि. २५ : नव्या पिढीला साहित्याची नव्याने ओळख करून देण्याची आली वेळ आली आहे अशा शब्दांत संगीत दिग्दर्शक निशिकांत सदाफुले यांनी मर्मावर बोट ठेवले. विहंग प्रतिष्ठान, नेहरुनगर , कुर्ला पूर्व आयोजित दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन संगीत दिग्दर्शक निशिकांत सदाफुले आणि आमदार मंगेश कुडाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेहरूनगर नागरिक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंग गोरे हे होते. यावेळी नेहरूनगर मधील सांस्कृतिक चळवळीला प्रोत्साहन देणाऱ्या विहंग प्रतिष्ठानला सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
ही चळवळ अधिकाधिक वाढावी आणि साहित्यिक दिवाळी नेहरूनगर मध्ये साजरी व्हावी यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार मंगेश कुडाळकर यांनी दिले. यावेळी बोलतांना उद्घाटक निशिकांत सदाफुले यांनी आपल्या नेहरूनगर मधील वास्तव्याच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. नेहरूनगर मध्ये पूर्वीही अशा पद्धतीची प्रदर्शने भरत होती. सांस्कृतिक आणि साहित्यिक ठेवा हा प्रत्येक पिढीला मिळतोच. पण बदलत्या काळानुसार आता नवीन पिढीला पुन्हा एकदा साहित्याची ओळख नव्याने करून देण्याची वेळ आली असल्याचे निशिकांत सदाफुले यांनी सांगितले.
यावेळी सदामंगल पब्लिकेशनच्या प्रज्ञा जांभेकर चव्हाण यांनी प्रकाशकां पुढील आव्हाने आणि आवाहने या दोन्ही कशा पद्धतीने असतात हे सांगितले. सदामंगल पब्लिकेशन च्या वतीने उपस्थित मान्यवरांना एकेक पुस्तक भेट देण्यात आले.
या प्रदर्शनात अमर शिल्पकथा या विषयावर महेश आणि मनीषा नाईक यांचे सादरीकरण होणार आहे. या प्रदर्शनात सुमारे २०० दिवाळी अंक मांडण्यात आले आहेत.
या प्रदर्शनातून जमा होणारा निधी हा मराठवाडा आणि पश्चिम सोलापूर मधील गावांमधील शाळा उघडण्यासाठी वापरण्यात येणार आहे, अशी माहिती विहंग प्रतिष्ठानचे प्रसाद मोकाशी यांनी दिली.
ML/ML/SL