अंटार्क्टिकात सापडले लाखो वर्षांची रहस्ये उलगडणारे ‘टाइम मशिन’

 अंटार्क्टिकात सापडले लाखो वर्षांची रहस्ये उलगडणारे ‘टाइम मशिन’

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पृथ्वीची उत्पत्ती आणि मानववंशाच्या उत्क्रांतीची अनेक रहस्ये उलगडण्यासाठी शास्त्रज्ञांचे सातत्यपूर्ण संशोधन सुरु असते. या संशोधनात सहाय्यभूत ठरणाऱ्या आणि काळाच्या पाउलखुणा उमटलेल्या वस्तू सापडल्या की या संशोधनाला अधिक बळकटी मिळते. असेच एक रहस्य उलगडणारी नैसर्गिक वस्तू आता अंटार्क्टिकामध्ये शास्त्रज्ञांनी शोधुन काढली आहे. भारतापासून साडेसात हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या अंटार्क्टिकाच्या बर्फाळ जमिनीखाली हा बर्फाचा तुकडा सापडला आहे. चार वर्षांच्या अथक परिश्रमानंतर एका आंतरराष्ट्रीय टीमने -35 अंश सेल्सिअस तापमानात 2.8 किमी खोल बर्फातून हा नमुना बाहेर काढला आहे. ‘बियॉन्ड एपिका’ प्रकल्पा अंतर्गत हे संशोधन करण्यात आले. या प्रकल्पासाठी लागणारा निधी युरोपियन युनियनने पुरवला आहे.

आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्सनुसार, शास्त्रज्ञांच्या एका टीमने 9,186 फूट लांब बर्फाचा भाग बाहेर काढला आहे. हा बर्फाचा तुकडा पृथ्वीची अनेक रहस्य उलगडणार आहे. या बर्फाच्या तुकड्यात लाखो वर्षे जुन्या वातावरणाचे बुडबुडे अडकले आहेत. या बुडबुड्यांच्या मदतीने त्यावेळच्या वातावरणातील स्थितीची अचूक अंदाज लावण्यास मदत होणार आहे. हे संशोधन पृथ्वीवरील हवामान बदल समजून घेण्यासाठी अमूल्य डेटा उपलब्ध करुन देणार आहे. या बर्फाचे 1 मीटरचे छोटे तुकडे करण्यात आले आहेत जेणेकरून त्याचा खोलवर अभ्यास करता येईल.

या बर्फात कार्बन डायऑक्साइड आणि मिथेनसारख्या हरितगृह वायूंची माहिती दडलेली असल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले. याचे विश्लेषण करुन सूर्यप्रकाश, ज्वालामुखीय क्रियाकलाप आणि पृथ्वीच्या कक्षीय स्थितीतील बदल यासारखे घटक हवामानावर कसा परिणाम करतात याची रहस्य उलगडण्या, मदत करणार आहे.

या संशोधनामुळे पृथ्वीवरील हिमयुगाचे स्वरूप अचानक कसे बदलले आणि त्याचा मानवी प्रजातींवरही नेमका काय परिणाम झाला, याचा तपशील मिळणार आहे. जवळपास 1 दशलक्ष वर्षांपूर्वी, पृथ्वीवरील हिमयुग चक्रात बदल झाला. ज्याने आदिम मानवी प्रजातींच्या अस्तित्वाला आव्हान दिले होते. या बर्फाच्या कोरचा अभ्यास केल्याने पृथ्वीच्या पर्यावरणाने त्या वेळी कसा प्रतिसाद दिला आणि जीव कसे टिकले हे समजण्यास मदत होईल असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

SL/ML/SL

12 Jan. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *