पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकमान्य टिळकांच्या समाधीवर कधी नतमस्तक होणार ?

मुंबई दि १६ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळकांची समाधी माहित आहे कां ? जर माहित असेल तर आजपर्यंत लोकमान्य टिळकांच्या समाधी स्थानी ते नतमस्तक का झाले नाहीत ? हा महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला प्रश्न आहे. १ ऑगस्ट १९३३ रोजी लाखो क्रांतीकारकांच्या उपस्थितीत, भर मुसळधार पावसात पत्रकार बापुजी अणे यांनी या स्मारकाचे उद्घाटन केले होते. त्यावेळी दैनिक ‘मराठा’चे संपादक आचार्य अत्रे म्हणाले, बापुजी अणे आले आणि सोळा आणे काम झाले.
या स्मारकाच्या तीस फुट खाली एक लोखंडी पेटारा देशबांधवांनी गुपचुपपणे पुरलेला असुन त्यात लोकमान्यांंनी वापरलेल्या वस्तु अंगरखा, उपरणे, धोतर, पगडी, गीतारहस्य, ओरायन, आर्क्टीक होम इन वेदाज व न. चिं. केळकर लिखित टिळक चरित्र हे ग्रंथ तसेच अस्थी कलश आहे. त्याकाळी लोकमान्य टिळकांचे नाव घेणे हा ‘राजद्रोहा’चा गुन्हा होता. आजची भारतीय युवा पिढी या शौर्य गाथेपासुन अनभिज्ञ आहे. सत्तेची मधुर फळे चाखणार्या या राजकारण्यांना स्वातंत्र्याच्या लढ्याचा विसर पडावा याची आम्हाला खंत वाटते.
आज देशाचे पंतप्रधान ज्या स्वदेशीचा नारा देत आहेत तो शंभर वर्षांपुर्वी लोकमान्य टिळकांच्या चतुःसुत्रीतील एक महत्वपुर्ण ‘भाग होता. भारतीय कामगारांवर इंंग्रजांनी जेंव्हा बेकारीचे संकट लादले होते तेंव्हा भारतीयांनी मँचेस्टरच्या कापडाची होळी करुन देशभर होळी साजरी केली व कामगारांना भीषण बेकारीतुन मुक्त केले. स्वदेशी कापडाला ( खादीला ) त्यामुळे महत्व प्राप्त झाले. भारतीय जनतेच्या एकजुटीमुळे त्यावेळी इंग्रजांचे धाबे दणाणले होते.
सर्व राजकारण्यांनी आणि जनतेने लक्षात ठेवले पाहिजे की, लोकमान्यांचा काळ हा स्वातंत्र्याचा धगधगता आणि तेजस्वी कालावधी होता. या लढ्यात लोकमान्य टिळकांना हिंदुंइतकीच मुसलमानांचीही साथ होती. मुसलमानही देशभक्तीच्या भावनेने प्रेरित झाले होते. बंगालच्या आठ कोटी मुसलमानांपैकी नव्वद टक्के मुसलमानांनी फाळणीच्या विरुद्ध मतदान केले होते. लोकमान्यांच्या धगधगत्या चितेवर उडी घेणारा देशभक्त मुसलमान तरुण होता.
स्वातंत्र्याचा उत्तरार्ध विकृत होता. हिंदुंचे खच्चीकरण आणि मुस्लिम तुष्टीकरणाचा होता. पुर्वार्धात घाबरणारा इंग्रज उत्तरार्धात एकदम रिलॅक्स झाला. पूर्वार्धात अखंड भारतासाठी लोक लढत होते. उत्तरार्धात लोक फाळणीसाठी लढत होते.
भारतीय चलनांवर अखंंड भारताचे प्रतिक असावे की विभाजनाचे, याचेही आम्हाला तारतम्य नसावे ही मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. अभिमान बाळगावा तो कोणाचा हे आजच्या सत्ताधार्यांनाच माहित नाही ते सामान्य जनतेला कसे कळणार ?
मोदीजींसारखे जागरुक नेतृत्व आज भारताला लाभले आहे. राष्ट्रासाठी दलिदान देणार्यांबद्दल त्यांच्या मनात नितांत आदर आहे. २ ऑक्टोबर रोजी देशाचे पंतप्रधान राजघाटावर गांधीजींच्या समाधीवर आदरांजली वाहतांना दिसतात. परंतु १ ऑगस्ट रोजी स्वराज्यभूमी येथे लोकमान्य टिळकांना समाधी स्थानी आदरांजली वाहतांना दिसत नाहीत हा अखंड भारतासाठी बलिदान देणार्या भारतीय क्रांतीकारकांचा अवमान नाही काय ? भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाची बुज राखणारी पिढी सत्तेवर येणे गरजेचे आहे.
पंतप्रधानांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे . राज्य सरकारच्या राजशिष्टाचार विभागाने जागरुकता दाखवली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी समाधी स्थानावर आल्यानंतरच सरकार धावपळ करणार काय ? ? ?
-प्रकाश सिलम, अध्यक्ष, लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समिती (८७७९५४१०५८ )
ML/ML/MS