टायगरमंक तर्फे पुण्याच्या ऐतिहासिक गणेश मंदिरांवरील माहितीपट मालिकेचे प्रकाशन

पुणे, दि २०
प्रसिद्ध फिल्म आणि मीडिया प्रॉडक्शन हाऊस टायगरमंकने पुण्याच्या ऐतिहासिक गणेश मंदिरांवरील पाच भागांची माहितीपट मालिका सादर केली आहे. “ऐतिहासिक गणपती मंदिरे” या शीर्षकाखाली साकारलेली ही मालिका पुण्यातील विस्मृतीत गेलेल्या पाच गणेश मंदिरांचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेवा उलगडते. या मालिकेत त्रिशुंड गणपती, खिंडीतला गणपती, गुपचुप गणपती, मोदी गणपती आणि मातीचा गणपती या मंदिरावरील माहितीपट आहेत.
प्रत्येक भागात या मंदिरांचे वास्तुशिल्प, भक्तीमय परंपरा आणि सांस्कृतिक परंपरेचे पैलू प्रभावीपणे सादर करण्यात आले आहेत.
या मालिकेचे प्रकाशन प्रसिद्ध इतिहास अभ्यासक आणि इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष श्री. मोहन शेटे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यांनी या संपूर्ण माहितीपट मालिकेमध्ये सूत्रधाराचे काम केले आहे. यावेळी टायगरमंकचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य राठी, कार्यकारी संचालक शैलेश बडवे आणि केतन जाधव हेही उपस्थित होते.
प्रकाशन सोहळ्यात बोलताना श्री. मोहन शेटे म्हणाले, “पुण्याचा ऐतिहासिक वारसा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला आहे. या मालिकेचा भाग होणे ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या कथा आणि पुरावे या माध्यमातून लोकांसमोर येत आहेत. ही मालिका पुढील पिढ्यांसाठी सांस्कृतिक ठेवा पोहोचवण्याचे प्रभावी साधन ठरेल.
टायगरमंकच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन! अशा उपक्रमांमुळे आपली ओळख टिकते आणि आपल्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेव्याचे जतन होण्यास मदत होते.”
आदित्य राठी, व्यवस्थापकीय संचालक, टायगरमंक म्हणाले, “श्रद्धा आणि उत्कटतेने साकारलेली ही मालिका म्हणजे पुण्याच्या पवित्र इतिहासाला आदरांजली आहे.
टायगरमंक मध्ये आम्ही कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर करून फिल्म्स आणि क्रिएटिव्ह प्रोजेक्ट्समध्ये नवकल्पना आणत आहोत. ही मालिका त्या दृष्टिकोनाचे प्रतीक आहे — जिथे तंत्रज्ञान आणि परंपरा यांचा संगम होतो. ऍनिमेशन आणि AI चा वापर करून आम्ही ऐतिहासिक कथा जिवंत करत आहोत.
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांना त्यांच्या सांस्कृतिक मुळांशी पुन्हा जोडणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”
शैलेश बडवे, कार्यकारी संचालक, टायगरमंक यावेळी बोलताना म्हणाले, “पुणे शहरामध्ये आपण गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो, पण या ऐतिहासिक मंदिरांचा वारसा फारच थोड्या लोकांना माहिती आहे. काही मंदिरांनी तर स्वातंत्र्य चळवळीतही महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि आजही एकतेचे प्रतीक म्हणून ती उभी आहेत. राज्य सरकारने गणेशोत्सवाला राज्यस्तरीय सण म्हणून मान्यता दिल्यानंतर, या मालिकेद्वारे आम्ही सर्व भक्तांना आवाहन करतो की त्यांनी प्रसिद्ध मंडळांपलीकडे पाहावे आणि येणाऱ्या गणेशोत्सवात या मंदिरांना देखील भेटी द्याव्यात आणि आपला समृद्ध इतिहास अनुभवावा.”
ही मालिका २० ऑगस्ट २०२५ पासून टायगरमंक.ओरिजिनल्स या कंपनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर पाहण्यासाठी उपलब्ध असेल.KK/ML/MS