नोव्हेंबरमध्ये रंगणार ‘महाराष्ट्र केसरीचा थरार

 नोव्हेंबरमध्ये रंगणार ‘महाराष्ट्र केसरीचा थरार

पुणे, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची आणि कुस्तीचा कुंभमेळा असणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाच्या तसेच वरिष्ठ अजिंक्यपद माती-गादी कुस्ती स्पर्धेचा थरार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात रंगणार आहे. यंदा या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी सोमेश्वर प्रतिष्ठानला मिळाली असून, पुणे जिल्ह्यातील लोणीकंद फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक स्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा भव्य स्वरूपात होईल, अशी माहिती ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचे मुख्य संयोजक सोमेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक प्रदीप कंद आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे यांनी पुण्यात पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत मध्ये दिली.

यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी आमदार दीपक पायगुडे, पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. हनुमंत गावडे, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष पै. योगेश दोडके, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष विलास कथुरे यांच्यासह पदाधिकारी, कुस्तीगीर उपस्थित होते.

प्रदीप कंद म्हणाले, “नगर रोडवर पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरी किताबाची स्पर्धा होत आहे. या स्पर्धेचे नियोजन अतिशय देखण्या स्वरुपात करण्याचा आमचा मानस आहे. २००९- १० मध्ये आम्ही हिंदकेसरी स्पर्धा घेतली होती. त्यामुळे कुस्ती स्पर्धा भरविण्याचा अनुभव आहे. महाराष्ट्रातील सर्व पैलवान आनंदी होतील, अशा स्वरुपात स्पर्धेचे आयोजन होईल. पदकप्राप्त कुस्तीगीरांना रोख स्वरुपात बक्षिसे देण्याची नियोजन आहे. “”

“सलग सहा दिवस या स्पर्धेचा थरार रंगणार असून, राज्यभरातील मल्ल एकमेकांशी दोन हात करणार आहेत. ३५ जिल्ह्यातील आणि ११ महापालिकामधील ४६ तालीम संघातील ९०० ते ९२५ मल्ल या स्पर्धेत सहभागी होत आहेत. यासह नामांकित ४० मल्लही सहभागी होणार आहेत. अतिशय रंजक अशा लढती पाहण्याची संधी आहे. आपल्या मल्लांनाही या स्पर्धेचा निश्चित फायदा होणार आहे. उदयोन्मुख खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्त्या पाहण्याची संधी मिळणार आहे,” असे पै. संदीप भोंडवे यांनी नमूद केले.

विलास कथुरे म्हणाले, “विविध दहा वजनी गटात, माती आणि गादी विभागात कुस्ती होतील. ९०० पेक्षा अधिक कुस्तीगीर, १० व्यवस्थापक, १० मार्गदर्शक, १२५ तांत्रिक अधिकारी, ९० पदाधिकारी सहभागी होणार आहेत. “

ML/KA/SL

25 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *