तारकर्ली समुद्रात तीन पर्यटक बुडाले, दोघांचा मृत्यू , एक अत्यवस्थ

 तारकर्ली समुद्रात तीन पर्यटक बुडाले, दोघांचा मृत्यू , एक अत्यवस्थ

सिंधुदुर्ग, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील मालवण , तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेल्या पुणे हडपसर येथील दोन युवकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यात गंभीर असलेल्या एका युवकावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज सकाळी ११.२० वाजण्याच्या दरम्यान तारकर्ली एमटीडीसी जवळील समुद्रात घडली.

याबाबतची माहिती अशी – हवेली तालुक्यातील कुश संतोष गदरे (वय २१), रोहन रामदास डोंबाळे (वय २०), ओंकार अशोक भोसले (वय २६), रोहित बाळासाहेब कोळी (वय २१) शुभम सुनील सोनवणे (वय २२) हे युवक तारकर्ली येथे पर्यटनासाठी आले होते. सकाळच्या सुमारास तारकर्ली पर्यटन विकास महामंडळ लगतच्या समुद्रात हे युवक समुद्र स्नानासाठी पाण्यात उतरले होते. यावेळी अचानक पाण्याच्या खोलीचा आणि लाटांचा अंदाज न आल्यामुळे पोहत असलेल्या युवकांपैकी ओंकार भोसले, रोहित कोळी, शुभम सोनवणे हे युवक पाण्यात ओढले गेले. पर्यटक बुडत असल्याचे निदर्शनास येताच किनाऱ्यावरील स्थानिक आणि तसेच पर्यटन व्यवसायिकांनी तत्काळ समुद्राच्या पाण्यात बचाव कार्य सुरू केले.

बोटीच्या सहाय्याने बुडालेल्या युवकांचा पाण्यात शोध घेण्यात आला. अखेर स्थानिकांकडून समुद्रात शोधकार्य सुरू असताना बुडालेल्या अवस्थेत तीनही युवक सापडून आले. त्यांना तत्काळ किनाऱ्यावर आणल्यावर रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता रोहित कोळी आणि शुभम सोनवणे यांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यात ओंकार भोसले हा अत्यवस्थ असून अधिक उपचार करण्यासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचाव कार्यात समीर गोवेकर वैभव सावंत दत्तराज चव्हाण महेंद्र चव्हाण राजेश्वर वॉटर स्पोर्ट्स चे कर्मचारी सहभागी झाले होते. या घटनेची माहिती येथील पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

ML/ML/SL

22 Feb. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *