बांग्लादेशात सरकार विरोधात हजारो आंदोलक रस्त्यावर

ढाका, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय उपखंडातील देशांमध्ये सध्या सत्ताधाऱ्याविरुद्ध तीव्र आंदोलनाचे वारे वाहत आहेत. बांगलादेशची राजधानी ढाका येथे पंतप्रधान शेख हसिना यांच्या विरोधात हजारो लोक रस्त्यावर उतरले. अल जझीराच्या वृत्तानुसार, लोकांनी ढाकामध्ये 13 किलोमीटर लांब मोर्चा काढला. याठिकाणी विरोधकांनी पुकारलेल्या रॅलीत हे लोक पोहोचले. हसिना यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली.
ढाकासह 16 ठिकाणी मोर्चे काढण्यात आले. त्यावेळी झालेल्या हिंसाचारात विरोधी पक्षाचा एक कार्यकर्ता ठार झाला, तर शेकडो लोक जखमी झाले. बांगलादेशचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने (बीएनपी) पुन्हा निवडणुकांच्या मागणीसाठी रॅलींचे आयोजन केले होते.
बांगलादेशातील विरोधी पक्ष अनेक दिवसांपासून सत्ताधारी पक्षावर (बांगलादेश अवामी लीग) भ्रष्टाचार आणि मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत आहेत. बीएनपीचे सरचिटणीस मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी शेख हसीना यांना ताबडतोब पायउतार व्हावे, संसद बरखास्त करावी आणि देशातील लोकशाही पुन्हा स्थापित करण्यासाठी अंतरिम काळजीवाहू सरकारकडे सत्ता सोपवावी, असे आवाहन केले आहे.
SL/KA/SL
20 July 2023