थायलंडच्या पंतप्रधानपदी या तरुण महिला नेत्या
बँकॉक, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आशिया खंडातील काही देशांमध्ये सत्ता परिवर्तनाचे वारे वाहत असून नवीन नेते सत्तेत येत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला बांगलादेशमध्ये आंदोलकांनी शेख हसीना यांची सत्ता उलथवून लावली. त्यानंतर थायलंडमध्ये श्रेथा थाविबाहसिन यांना दोनच दिवसांपूर्वी न्यायालयाने पंतप्रधानपदावरून हटवले होते. गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या वकिलाचा मंत्रिमंडळात समावेश केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. हे पाऊल नैतिकतेचे उल्लंघन असल्याचे सांगत न्यायालयाने पंतप्रधानांना दोषी घोषित केले होते. त्यानंतर आता थायलंडमध्ये संसदेने पाइतोंग्तार्न शिनावात्रा यांची पंतप्रधानपदासाठी निवड केली आहे. माजी पंतप्रधान थाक्सिन शिनावात्रा यांच्या त्या कन्या आहेत. 37 वर्षीय पाइतोंग्तार्न या देशाच्या 31 व्या पंतप्रधान बनल्या आहेत. थायलंडच्या इतिहासातील त्या सर्वात तरुण पंतप्रधान, तसेच हे पद भूषवणाऱ्या देशातील दुसऱ्या महिलाही आहेत.
यिंगलक या थायलंडच्या पंतप्रधान झालेल्या देशातील पहिल्या महिला होत्या. त्या पाइतोंग्तार्न यांच्या मावशी आहेत. पाइतोंग्तार्न या शिनावात्रा कुटुंबातील पंतप्रधान बनलेल्या तिसऱ्या नेत्या आहेत. थाक्सिन यांचे मेहुणे सोमचाई वोंगसावत यांनीही 2008 मध्ये थायलंडचे पंतप्रधान म्हणून काम केले होते.
थाक्सिन 2001 मध्ये थायलंडचे पंतप्रधान झाले. थाक्सिन शिनावात्रा यांची सत्तापालटाच्या माध्यमातून सत्तेतून हकालपट्टी करण्यात आली. पाइतोंग्तार्न या सत्ताधारी पक्ष ‘फेउ थाई’च्या नेत्या आहेत. तथापि, पाइतोंग्तार्न अद्याप खासदार नाहीत. संसदेत शिनावात्रा यांच्या बाजूने 319 मते पडली, तर त्यांच्या विरोधात 145 मते पडली. 27 खासदारांनी मतदान केले नाही. सभागृहात 493 खासदार आहेत. पाइतोंग्तार्न यांना बहुमत मिळविण्यासाठी 248 मतांची आवश्यकता होती. शुक्रवारी 489 खासदार सभागृहात उपस्थित होते.
पाइतोंग्तार्न शिनावात्रा या 2023 पासून फेउ थाई पार्टीच्या अध्यक्ष आहेत. एप्रिल 2023 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारही होत्या. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिला.
याआधी गेल्या आठवड्यात घटनात्मक न्यायालयाने मुख्य विरोधी पक्ष मुव्ह फॉरवर्ड पार्टीला फेटाळून लावले होते. याशिवाय त्यांच्या सर्व नेत्यांवर 10 वर्षांची बंदी घालण्यात आली होती. गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत मुव्ह फॉरवर्ड पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या.
पाइतोंग्तार्न यांचे वडील, माजी पंतप्रधान थाक्सिन शिनावात्रा यांना 2006 मध्ये लष्करी उठावात सत्तेतून काढून टाकण्यात आले. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. न्यायालयाच्या निर्णयानंतर ते हद्दपार झाले. ते देश सोडून गेले. यानंतर थाक्सिन यांनी आपली बहीण यिंगलक यांना पुढे केले. 2011 मध्ये त्या पंतप्रधान झाल्या. देशाबाहेर राहून बहिणीच्या मदतीने सरकार चालवल्याचा आरोप थाक्सिनवर होता. ते परदेशात मंत्र्यांना भेटायचे. सिंगापूरमधील मंत्र्यांसोबत अशाच एका भेटीचे रेकॉर्डिंग समोर आले आहे.
यामध्ये थाक्सिन हे कर्जमाफी विधेयकाबाबत सूचना देत असल्याचे सांगण्यात येत होते. या विधेयकामुळे थाक्सिनला थायलंडला मुक्त परतण्याचा मार्ग मोकळा होईल. यानंतर थायलंडच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली होती. यिंगलक यांना 2014 मध्ये न्यायालयाने पदावरून हटवले होते. यिंगलक यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते.
पंतप्रधान श्रेथा केवळ एक वर्ष सत्तेत राहू शकले. 22 ऑगस्ट 2023 रोजी ते थायलंडचे पंतप्रधान झाले होते.
SL/ML/SL
`6 August 2024