यंदाचा पाऊस सामान्य, स्कायमेट चा अंदाज

मान्सून 2025 साठी Skymet चा अंदाज जाहीर; महाराष्ट्रात किती पाऊस होणार?
नवी दिल्ली : हवामान विषयक खासगी संस्था स्कायमेट ( Skymet ) वेदरने 2025 च्या मान्सून हंगामासंदर्भात आपला अंदाज जाहीर केला असून, यंदाचा पाऊस ‘सामान्य ते थोडासा जास्त’ स्वरूपाचा राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत देशभरात सरासरीच्या सुमारे 103% पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ला निना आणि एल निनोचा प्रभाव कमी
स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतिन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हंगामात ला निना कमकुवत राहण्याची शक्यता असून, एल निनोचा प्रभावही फारसा जाणवणार नाही. यामुळे भारतात मान्सूनवर अनुकूल परिणाम होईल.
एल निनो दक्षिणी दोलन (ENSO) न्यूट्रल राहील, तर आयओडी (Indian Ocean Dipole) सकारात्मक राहण्याची शक्यता असल्याने पावसासाठी ही परिस्थिती पोषक ठरणार आहे.
राज्यनिहाय पावसाचा अंदाज
स्कायमेटच्या प्राथमिक अंदाजानुसार, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, तसेच पश्चिम आणि दक्षिण भारतात समाधानकारक पाऊस होईल.
पश्चिम घाटातील केरळ, कर्नाटक किनारपट्टी आणि गोवा या भागांत विशेषतः अधिक पावसाची शक्यता आहे. मात्र, उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये आणि पर्वतीय भागात सरासरीच्या तुलनेत थोडकासा कमी पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महिन्यानुसार पावसाचे विभाजन
जून : सरासरीच्या 96% म्हणजे सुमारे 165.3 मिमी पाऊस
जुलै : सरासरीच्या 102% म्हणजे 280.5 मिमी पाऊस
ऑगस्ट : सरासरीपेक्षा जास्त, सुमारे 108% म्हणजे 254.9 मिमी
सप्टेंबर : सरासरीच्या 104% म्हणजे 167.9 मिमी पावसाची शक्यता
मान्सून मोजण्याच्या पद्धती
भारतीय हवामान खात्यानुसार, पावसाची नोंद पाच मुख्य श्रेणींमध्ये होते
90% पेक्षा कमी – अपुरा पाऊस
90-95% – सरासरीपेक्षा कमी
96-104% – सरासरीइतका पाऊस
105-110% – सरासरीपेक्षा जास्त
110% पेक्षा अधिक – भरघोस पाऊस
हवामानशास्त्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या या अंदाजानुसार, यंदा मान्सूनचा दुसरा टप्पा (जुलै-ऑगस्ट) अधिक सक्रिय राहण्याची शक्यता आहे. पावसाच्या स्वरूपामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
तसेच, जलसाठ्यांसाठीही ही वेळ अनुकूल राहील, असा सकारात्मक सूर स्कायमेटने दर्शवला आहे.