विधानसभेतील ही होती आजची प्रश्नोत्तरे
नागपूर, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील साकव नव्याने बांधणे, दुरुस्ती करणे यासाठी वाढीव निधी लागत असल्यानं तो विषय जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात घेतला जात असून त्यासाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यासाठी स्वतंत्र तरतूद केली जाईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
हा मूळ प्रश्न राजन साळवी यांनी उपस्थित केला होता, त्यावर विजय वडेट्टीवार , यशोमती ठाकूर, शेखर निकम, आशिष जयस्वाल आदींनी उप प्रश्न विचारले होते. राज्यातील साकवांसाठी एकूण साडे तेराशे कोटी खर्च लागणार आहे, त्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव दिला होता तो नाकारला गेला त्यामुळे आता राज्य सरकार त्यासाठी स्वतंत्र निधी तयार करणार आहे असं मंत्री म्हणाले.
विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना निर्यातीसाठी अनुदान म्हणून १७० कोटींची तरतूद करण्यात आली आहे, ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या संत्री निर्यात करतील त्यांना तो देण्यात येईल अशी माहिती पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी संबधित प्रश्नाच्या उत्तरात दिली. हा प्रश्न मोहन मते यांनी उपस्थित केला होता.
संत्री निर्यात ही बाब केंद्र सरकार आणि संबधित कंपनी यांच्या करारानुसार आहे त्यात राज्य सरकारचा थेट संबंध नाही तरीही शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी हा निधी मंजूर करण्यात आल्याचं मंत्री म्हणाले. आता संत्र्याचा मोसम संपला आता निधीचा उपयोग काय असे सवाल अनिल देशमुख , देवेंद्र भुयार , यशोमती ठाकूर आदींनी केला.
मुंबई विद्यापीठात दूरस्थ शिक्षण विभागाच्या परीक्षांचा निकाल उशिरा लागल्याबद्दल विद्यापीठाला समज देण्यात आली आहे अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे, मूळ प्रश्न विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला होता. आजवर विद्यापीठाने ३७२ परीक्षा घेतल्या आहेत, विद्यापीठाला १३८ पदे भरण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे असं मंत्री म्हणाले.
ML/KA/SL
18 Dec. 2023