राज्यातील या देवस्थानाला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा जाहीर

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे दर बारा वर्षांनी भरणारा सिंहस्थ कुंभमेळा हा देशातील सर्वांत मोठ्या धार्मिक आणि आध्यात्मिक सोहळ्यांपैकी एक मानला जातो. या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने राज्य सरकारने त्र्यंबकेश्वर देवस्थानाला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने हा निर्णय मंजूर केला असून, विभागीय आयुक्तांनी यासंदर्भातील प्रस्ताव जानेवारी महिन्यात शासनाकडे पाठवला होता. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराच्या या नव्या दर्जामुळे येथे होणाऱ्या विकासकामांना मोठी चालना मिळणार आहे.
या घोषणेमुळे त्र्यंबकेश्वरातील पायाभूत सुविधा अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळ्याच्या तयारीसाठी विकास प्रकल्पांची पायाभरणी केली होती. यामध्ये रस्ते रुंदीकरण, पाणीपुरवठा योजना, स्वच्छतागृहांची उभारणी आणि भाविकांसाठी निवास व्यवस्थेचा समावेश आहे.
सरकारद्वारे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मोठा निधी मंजूर केला आहे. ज्यामुळे कुंभमेळ्यादरम्यान येणाऱ्या लाखो भाविकांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. तसेच, गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठीही विशेष मोहीम राबवण्यात आली होती, ज्यामुळे पर्यावरण संरक्षणाला अधिक महत्त्व देण्यात आले.
‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्याने त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या विकास आराखड्याला वेग मिळणार असून, भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा भाविकांसाठी मोठी आनंदवार्ता ठरली आहे.कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्याने भाविकांना व मंदिर प्रशासनाला फायदा होणार आहे.
SL/ML/SL
28 March 2025