मुंबईच्या रस्त्यांवर यंदा पहिल्यांदाच रिॲक्टीव्ह अस्फाल्टचा प्रयोग
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई महानगरात पावसाळ्यात रस्त्यांवर निर्माण होणारे खड्डे जलदगतीने भरता यावे म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. खड्डे भरण्यासाठी यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच रिॲक्टीव्ह अस्फाल्ट मटेरिअलचा वापर केला जात आहे. या कामासाठी महानगरपालिका क्षेत्रात विभागनिहाय कामासाठीची जबाबदारी निश्चित करून खड्डे बुजवण्यासाठी तरतूद केली आहे. या रिअॕक्टिव्ह अस्फाल्टचा वापर एच पूर्व विभागात खार सबवे येथे करण्यात आला आहे.
खास करून खड्ड्यांमुळे वाहतूकीचा खोळंबा होऊ नये यासाठी तातडीने खड्डे बुजवण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिल्या आहेत. त्यानुसार मुंबईत तीन ठिकाणी रिॲक्टीव्ह अस्फाल्टच्या मिश्रणाचा वापर करत तीन ठिकाणी पथदर्शी प्रकल्प राबविल्याची माहिती पी. वेलरासू यांनी दिली. मुंबईकरांना उत्तम दर्जाचे रस्ते देण्यासाठी यंदाच्या पावसाळ्यात विविध उपाययोजना राबविल्या जात असल्याचे उपायुक्त (पायाभुत सुविधा) उल्हास महाले यांनी नमूद केले.
खार भुयारी मार्ग येथे गुरुवारी (२९ जून) खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. याठिकाणी रिअॕक्टिव्ह अस्फाल्टचा वापर करून तात्काळ रस्ते वाहतूक पूर्ववत करण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात खड्डे बुजवण्यासाठी रिॲक्टीव्ह अस्फाल्टचा वापर करत एक पथदर्शी प्रयोग काही दिवसांपूर्वीच पार पडला. पथदर्शी प्रकल्पामध्ये मिश्रणाच्या वापराचा यशस्वी परिणाम आढळून आला. म्हणून मिश्रणाचा वापर संपूर्ण महानगरात करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते विभागाने घेतला आहे. रस्ते विभागाने प्रत्येक विभागनिहाय हे मिश्रण रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी पुरवले आहे.
असा आहे वापर-
रिॲक्टीव्ह अस्फाल्ट हे केमिकल मिश्रीत डांबर आहे. महत्वाचे म्हणजे एरवी पाण्याच्या संपर्कात आल्याने डांबरी रस्त्यावर खड्डे तयार होतात, मात्र रिॲक्टीव्ह अस्फाल्टच्या मिश्रणावर पाणी टाकूनच खड्डा भरण्यात येतो. केमिकलची पावडर, खडी आणि पाणी या मिश्रणाचा वापर खड्डे बुजवण्यासाठी करण्यात येतो. रिअॅक्टीव्ह अस्फाल्टमधील केमिकल पावडरवर पाण्याचा कोणताही परिणाम होत नाही. अवघ्या दोन तासांमध्ये वाहतूक सुरू करता येते, असे मिश्रणाचे वैशिष्ट्य आहे. मुंबईतील सर्व २४ विभागांना मिश्रणाच्या पिशव्या पुरविण्यात आल्या आहेत. इकोग्रीन इन्फ्रा डेव्हलपमेंट या कंपनीकडून हे तंत्रज्ञान विभागांना पुरवण्यात आले आहे. त्यातील केमिकल पावडरची आयात करण्यात आली आहे. This is the first time reactive asphalt is being used on the roads of Mumbai
मुंबईतील पथदर्शी प्रकल्प अंतर्गत शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे याठिकाणी काही रस्त्यांवर खड्डे बुजवण्यासाठी या मिश्रणाचा वापर करण्यात आला. त्यानंतर या रस्त्यांवर खड्डे बुजवलेल्या ठिकाणी वाहतूकही सुरळीतपणे सुरू राहीली आहे. रस्त्यावरची खडी निघणे किंवा पुन्हा खड्डा पडणे यासारखी कोणतीही तक्रार निदर्शनास आली नाही.
रॅपिड हार्डनिंग कॉंक्रिटचाही होणार वापर-
गतवर्षीच्या पावसाळ्यात महानगरपालिकेकडून रॅपिड हार्डनिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. तंत्रज्ञानाच्या वापरासाठी नऊ सेवा पुरवठादारांच्या माध्यमातून मुंबई महानगरात रॅपिड हार्डनिंगचा वापर करण्यात येईल. या तंत्रज्ञानाच्या वापरातही महानगरपालिकेला यश मिळाले. मात्र या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी कोरड्या पृष्ठभागाची गरज असते. रॅपिड हार्डनिंग कॉंक्रिगचा वापर केल्यानंतर सदर रस्त्यावरून सहा तासांनी वाहतूक सुरू करणे शक्य होते.
कोल्डमिक्सचा पुरवठा-
मुंबईतील सहा मीटर आणि त्यापेक्षा कमी रूंदीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी महानगरपालिकेच्या परिरक्षण खात्यामार्फत कोल्ड मिक्सचा वापर करण्यात येणार आहे. मुंबईतील सर्व विभागात आतापर्यंत १३०० मेट्रिक टन कोल्डमिक्स खड्डे बुजवण्यासाठी पुरवण्यात आले आहे. तर २०० मेट्रिक टन कोल्ड मिक्स राखीव ठेवण्यात आले आहे.
ML/KA/PGB
30 Jun 2023