ही फूट नाहीच, हा तर सत्तेसाठीचा खटाटोप

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगात महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. ही सुनावणी संपायला काही वेळ बाकी असतानाच शरद पवार गटाचे ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर आले. त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सुनावणीत नेमकं काय घडलं? याबाबत प्रतिक्रिया दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी गेल्या 20 वर्षात शरद पवार यांच्याबाबत कोणतीच तक्रार केली नाही. पक्षात याआधी कोणताही वाद नसताना अशाप्रकारची सुनावणी होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया अभिषेक मनु सिंघवी यांनी दिली.
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली की, “ब्रम्हानंद रेड्डी विरुद्ध इंदिरा गांधी केसचा संदर्भ घेण्यात आला आहे. वाद हा अचानक होत नसतो. त्याला पार्श्वभूमी असते. मात्र इथे तसं नाही. आमचा पक्ष 1999 नंतर पूढे कसा गेला, याबाबत माहिती दिली. 2020 साली कोरोना होता म्हणून त्यावेळी पक्षांतर्गत निवडणूक झाली नव्हती. त्यानंतर मात्र निवडणूक झाली. एका रात्रीत नवरा बायकोला सुद्धा घटस्फोट मिळत नाही. त्यासाठी देखील कलावधी जातो. मग इथ कसं शक्य आहे की एका दिवसांत यांचा वाद झाला? वाद हा पक्षाचा नाही तर सत्तेचा आहे. शरद पवार यांनी कष्टाने पक्ष निर्माण केला आहे”.
“वकील देवदत्त कामत यांनी आज आमची बाजू मांडली. अजित पवार गटात चुकीच्या बाबी घडल्या. शरद पवार यांनी 1999 पासून पक्ष स्थापन केला आणि वाढवला. त्यांच्यावर 20 वर्षात कधी आरोप झाले नाहीत. पहिल्यांदा 2023 मध्ये आरोप लावण्यात आला की 2018 पासून झालेल्या निवडणुका चुकीच्या आहेत. राष्ट्रीय अधिवेशन चुकीचं आहे. हे आरोप प्रफुल्ल पटेल, अजित पवार यांच्या वतीने करण्यात येत आहेत. महत्वाची बाब म्हणजे याच दोन नेत्यांनी शरद पवार यांना अध्यक्ष करण्यासाठी अनुमोदन दिलं होतं आणि 30 जून 2023 ला यांनी सांगितल की, पक्षात फूट आहे”, असा दावा अभिषेक मनु सिंघवी यांनी केला.
“आमचं स्पष्ट मत आहे की असं अचानक राष्ट्रवादी 1 आणि 2 असं केलं कसं? याआधी त्यांनी कधीही तक्रार केली नाही. कधी शरद पवार यांच्या अध्यक्ष पदाबाबत वाद झाला नाही. मुळात आधीचा कोणताच वाद नाही. त्यांनी केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी निर्णय घेतला आहे. आम्ही आजच्या सुनावणीवेळी काही संदर्भ दिले आहेत. यामधे स्पष्ट केलं आहे की, पक्षात पूर्वीपासून वाद असतील तर दोन गटाबाबत विचार केला जाईल. मात्र राष्ट्रवादीबाबत असं झालेलं नाही. अचानक यांनी वाद निर्माण केला आहे. आम्ही अजित पवार गटाला एक्सपोज करण्याचं काम करत आहोत”, असं अभिषेक मनु सिंघवी म्हणाले.
SL/KA/SL
24 Nov. 2023