हे आहेत फ्रान्सचे सर्वात तरुण आणि पहिले गे पंतप्रधान

पॅरिस, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आपल्या देशात अजुनही गे, लेस्बियन, तृतीयपंथिय अशा व्यक्तींना समाजाकडून स्वीकारले जात नाही. मात्र जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही त्रिविचार सुत्री देणाऱ्या फ्रान्सच्या जनतेने एका गे व्यक्तीला पंतप्रधानपदी स्वीकारले आहे.
फ्रान्सचे अध्यक्ष इम्युनियल मॅक्रोन यांनी ३४ वर्षीय गॅब्रियल अटल यांची नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे. गॅब्रिएल अटल हे फ्रान्सचे सर्वात तरुण आणि उघडपणे गे असल्याचं जाहीर केलेले पहिले पंतप्रधान आहेत. गॅब्रियल अटल हे मॅक्रोन यांच्या सरकारमध्ये शिक्षण मंत्री होते. आता त्यांची वर्णी पंतप्रधान म्हणून लागली आहे. रॉयटर्सने वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
ओपीनियन पोलमध्ये फ्रान्सचे अध्यक्ष इम्युनियल मॅक्रोन यांची यावेळची निवडणूक जिंकणे कठीण असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कट्टर उजव्या विचारसरणीचे नेते मरिन ले पेन यांचा पक्ष आठ ते दहा टक्के अधिक मतदान मिळवण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे मॅक्रोन मोठे निर्णय घेताना दिसत आहेत.अटल हे फ्रान्समध्ये कोरोना महामारीच्या काळात चांगलेच चर्चेत आले होते. या काळात त्यांनी केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक झाले होते. ओपेनियन पोलमध्ये अटल हे सर्वाधिक प्रसिद्ध नेते म्हणून समोर आले आहेत. एलीझाबेथ बॉर्ने यांनी दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता. मॅक्रॉन यांनी घेतलेल्या काही निर्णयाबाबत मतभेद असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला होता.
मॅक्रॉन यांनी मागील वर्षी नव्या राजकीय बदलाचे संकेत दिले होते. तसेच येऊ घातलेल्या निवडणुकीच्या तयारीसाठी आपली दावेदारी प्रबळ करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. अटल यांच्या निवडीनंतर मॅक्रॉन म्हणाले की, प्रिय गॅब्रिएल अटल, तू तुझ्या उर्जेने आणि ध्यासाने मी जाहीर केलेल्या योजनांची अंमलबजावणी करशील याचा मला विश्वास आहे.
SL/KA/SL
9 Jan. 2024