कंत्राटी पद्धतीने भरतीचा आघाडी सरकारचा निर्णय या सरकारने केला रद्द

 कंत्राटी पद्धतीने भरतीचा आघाडी सरकारचा निर्णय या सरकारने केला रद्द

मुंबई दि २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारने नऊ एजन्सी नेमून एकत्रित पणे कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याचा निर्णय आम्ही रद्द करीत आहोत अशी घोषणा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रकार परिषदेत केली . यावेळी त्यांनी भरती प्रक्रिया करण्याबाबतचे आघाडी सरकारची सर्व कागदपत्रे ही सादर केली.

अशा पद्धतीने कंत्राटी भरती करताना तेव्हा विविध आरक्षणाबाबत का विचार केला नाही असा सवाल करीत फडणवीस यांनी काँग्रेस , उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांनी याची उत्तरे द्यावीत अशीही मागणी केली. २०२० ते २०२२ या काळात अशी कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यापूर्वी देखील काँग्रेसच्या काळात सुशीलकुमार शिंदे यांनी शिक्षण विभागातून अशा भरतीचा निर्णय घेतला होता , तो अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळातही सुरूच होता मग हे पाप करताना आम्हाला का दोष देता असा सवाल फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला.

आघाडी सरकारने नऊ एजन्सी ना केंद्रीभूत पद्धतीने नोकर भरती करण्यासाठी नेमण्याचा निर्णय घेतला होता, त्यासाठी पंचवीस ते तीस टक्के जास्त दराने निविदा काढण्यात आल्या होत्या. आमचे सरकार आल्यावर आम्ही हे दर कमी करून घेतले मात्र हे मागच्या सरकारचे धोरण असल्याने ही निविदाच आम्ही रद्द करीत आहोत असे ते म्हणाले. या निमित्ताने आमच्यावर आरोप करणाऱ्या ठाकरे , पवार गट आणि काँग्रेस यांनी हे आपले पाप असताना त्याचे खापर आमच्यावर फोडलं त्याची लाज त्यांना वाटायला हवी असेही ते म्हणाले.

ठाकरे , पवार गट आणि काँग्रेस यांनी राज्यातील तरुणांची दिशाभूल केली आहे, त्याबद्दल त्यांनी माफी मागावी अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली. सध्या राज्यात असंतोष तयार करून अराजक माजवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

कंत्राटी पोलीस ही तात्पुरती व्यवस्था

राज्यात इतर नियमित पद भरतीसोबत पोलिसांच्या १८ हजार पदांची भरती करण्यात आली आहे, त्यात सुमारे आठ हजार पदे मुंबई पोलिसांची आहेत , मात्र आपल्याकडे सध्या अठरा हजार पोलिसांच्या प्रशिक्षणाची सोय आहे त्यामुळे अधिक भरती करता येत नाही. त्यांचे प्रशिक्षण दीड वर्षे चालते तोवर मुंबई सारख्या अतिसंवेदनशील शहरात काही घडले तर व्यवस्था असावीच लागते म्हणून पोलीस पद्धतीनेच भरती केलेल्या राज्याच्या सुरक्षा महामंडळातून तीन हजार रक्षक मुंबई पोलिसात तात्पुरत्या स्वरुपात नेमले जात आहेत अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी दिली.

ML/KA/SL

20 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *