14 वर्षे वयोगटातील मुलींना ही कॅन्सर प्रतिबंधक लस मोफत
मुंबई, दि. २५ : भारतात महिलांमध्ये आढळणाऱ्या कॅन्सरच्या प्रकारांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हे एक मोठे संकट आहे. या विरोधात केंद्र सरकारने आता देशव्यापी ‘एचपीव्ही’ (HPV) लसीकरण मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेतंर्गत देशातील 14 वर्षे वयोगटातील मुलींना लक्ष्य करण्यात येणार असून, त्यांना ही प्रतिबंधात्मक लस पूर्णपणे मोफत दिली जाईल.
लसीकरण सत्रे प्रशिक्षित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली राबवली जातील. लसीकरणानंतर मुलींना काही काळ निरीक्षणाखाली ठेवले जाईल, जेणेकरून कोणत्याही दुर्मिळ दुष्परिणामांचे तात्काळ व्यवस्थापन करता येईल. सर्व लसीकरण केंद्रे 24×7 सरकारी आरोग्य सुविधांशी जोडलेली असतील, ज्यामुळे पालकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होईल.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही लसीकरण मोहीम पूर्णपणे ऐच्छिक असेल. सध्या खासगी रुग्णालयांमध्ये या लसीच्या एका डोससाठी सुमारे 4,000 रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र, आता आयुष्मान आरोग्य मंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्र, उप जिल्हा आणि जिल्हा रुग्णालये तसेच सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ही लस मोफत उपलब्ध करून दिली जाईल. या कार्यक्रमासाठी ‘गार्डासिल’ (Gardasil) या लसीचा वापर केला जाणार आहे, जी आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत सुरक्षित मानली जाते.
भारतात दरवर्षी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची सुमारे 80,000 नवीन प्रकरणे समोर येतात, तर दुर्दैवाने 42,000 हून अधिक महिलांचा यामुळे मृत्यू होतो. महिलांमध्ये आढळणारा हा दुसरा सर्वात सामान्य कॅन्सर आहे.
SL/ML/SL