छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार हा बॉलिवूड अभिनेता

मुंबई, 03 जून (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मसाण, उरी, राझी अशा वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमधुन हटके भूमीका साकारणारा बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आता छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या ऐतिहासिक घटनांवर चित्रपट निर्मिती करण्याचा ट्रेंड आहे. लक्ष्मण उतेकर हा मराठी दिग्दर्शक छत्रपती संभाजी महाराजांवर काढत असून त्यात विकी कौशल मुख्य भूमिका साकारणार आहे. लवकरच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित या चित्रपटाचं नाव ‘छावा’ असं असणार आहे. विकी कौशलचं नाव जरी मुख्य भूमिकेसाठी निश्चित झालेलं असलं. तरी संभाजी महाराजांची पत्नी येसूबाईंची भूमिकाकोण साकारणार हे अद्याप समोर आलेलं नाही. या भूमिकेसाठी निर्माते चांगल्या अभिनेत्रीच्या शोधात आहेत. पण या भूमिकेसाठी रश्मिका मंदान्ना, क्रिती सेनन आणि सारा अली खान या अभिनेत्रींच्या नावाची सर्वात जास्त चर्चा आहे. या अभिनेत्रींच्या कास्टिंगवर नेटिझन्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत. तर काही जण या भूमिकेसाठी एखादी मराठी अभिनेत्रीच शोभून दिसले असं देखील म्हणत आहेत.
छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे. विकी कौशल त्याच्या आगामी चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिका साकारणार असल्याची माहिती आहे. एवढंच नाही तर अभिनेत्याने या चित्रपटासाठी वजन वाढवायला देखील सुरुवात केली आहे.
‘जरा हटके जरा बचके’ रिलीज झाल्यानंतर विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांच्या बायोपिकची तयारी सुरू केली आहे. या चित्रपटासाठी विकी सध्या तलवारबाजीचे प्रशिक्षण घेत आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे. चित्रपटासाठी तलवारबाजी शिकण्यासाठी विकी कौशल बँकॉकमध्ये एक महिना घालवणार आहे.
SL/KA/SL
3 June 2023