भाईजानच्या चित्रपटात झळकणार हा बिग बॉसचा स्पर्धक
मुंबई,दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या चर्चेत असणारा छोट्या पडद्यावरील कार्यक्रम ‘बिग बॉस 16’ चा ग्रॅंड फिनाले अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. लोकप्रिय असणाऱ्या या कार्यक्रमात नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत.बिगबॉसच्या घरातील प्रत्येक स्पर्धक या शेवटच्या टप्प्यावर खूप मेहनत घेताना दिसतो आहे. अशातच एका स्पर्धकाचे ‘बिग बॉस 16’चा अंतिम निकाल लागण्यापूर्वीच नशीब उजळले आहे.
मराठी बिग बॉस पर्व २ चा विजेता शिव ठाकरे सध्या चालू असणाऱ्या हिंदी बिग बॉसमध्ये टॉप ६ मध्ये आहे. या पर्वाच्या सुरुवातीपासूनच तो विविध कारणांनी चर्चेत आहे. शिवच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शिव ठाकरे बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या आगामी सिनेमात झळकणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ‘बिग बॉस 16’च्या नुकत्याच पार पडलेल्या एका भागात शिव ठाकरे आणि प्रियंका चहर चौधरीने पती-पत्नी म्हणून एक नाटक केलं. या नाटकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. शिव ठाकरेचा अभिनय सलमानच्या पसंतीस उतरल्याने त्याने त्याला आगामी सिनेमासाठी विचारणा केल्याचे चर्चिले जात आहे. अद्याप या संदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
‘बिग बॉस 16’च्या ग्रॅंड फिनालेत अर्चना गौतम, प्रियंका चौधरी, शालीन भानोत, निम्रीत कौर, एमसी स्टॅन आणि शिव ठाकरे या स्पर्धकांचा समावेश आहे. पण अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार यंदाच्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे होऊ शकतो,असा अंदाज बांधला जात आहे. शिव ठाकरेचा खेळ चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून ते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला पाठिंबा देत आहेत.
सलमान खानसाठी 2023 हे वर्ष खूपच खास आहे. भाईजानचे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत. येत्या वर्षात सलमानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून अनेक कलाकारांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. ‘बिग बॉस 13’ फेम शहनाज गिलदेखील या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तसेच त्याचा ‘टायगर 3’ (Tiger 3) हा सिनेमादेखील प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. सलमानने शाहरुखच्या ‘पठाण’ सिनेमातदेखील आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. अशाच एका आगामी चित्रपटासाठी शिव ठाकरेची सलमान खानने निवड केली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
TM/KA/SL
6 Feb. 2023