नाट्य परिषदेच्या निवडणूकीत या अभिनेत्याने मारली बाजी
मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अखिल भारतीय नाट्य परिषदेची निवडणूकीमध्ये यावर्षी जोरदार चुरस पहायला मिळाली. एक प्रख्यात अभिनेता आणि एक यशस्वी निर्माता दोघांमध्ये रंगलेली ही लढत कोण जिंकणार याची नाट्य प्रेमींना उत्सुकता लागून राहीली होती. प्रशांत दामले आणि प्रसाद कांबळी या नाट्यक्षेत्रातील प्रस्थापितांमध्ये झालेल्या या जोरदार लढतीची मतमोजणी आज पहाटे पर्यंत सुरू होती. अखेर यामध्ये प्रशांत दामले यांना विजयी घोषित करण्यात आले
या निवडणुकीत प्रशांत दामले यांच्या ‘रंगकर्मी नाटक समूह’ पॅनलचा दणदणीत विजय झाला. तर नवनाथ कांबळी (प्रसाद कांबळी) यांच्या आपलं पॅनल पराभूत झालं.
या निवडणुकीत मुंबई मध्यवर्ती शाखेतील दहा जागांपैकी ८ जागांवर दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूहाचे उमेदवार निवडून आले. तर उर्वरीत दोन जागांवर प्रसाद कांबळी यांच्या आपलं पॅनलचे दोन उमेदवार निवडून आले. मुंबई मध्यवर्तीत शाखेत एकूण १,३२८ जणांनी मतदान केलं. त्यात माटुंगा इथल्या यशवंत नाट्य मंदिरात १,२४५ तर गिरगांव इथं ८३ जणांनी मतदान केलं. मुंबई उपनगर शाखा (मुलुंड – बोरिवली- वसई) इथं एकूण ७३० जणांनी मतदान झाले.
‘रंगकर्मी नाटक समूहा’कडून प्रशांत दामले (७५९), विजय केंकरे (७०५), विजय गोखले (६६४), सयाजी शिंदे (६३४), सुशांत शेलार (६२३), अजित भुरे (६२१) , सविता मालपेकर (५९१), वैजयंती आपटे(५९०) भरघोस मतांनी विजयी झाले. तर आपलं पॅनल मधून प्रसाद कांबळी (५६५) आणि अभिनेत्री सुकन्या मोने (५६७) विजयी झाल्या.
SL/KA/SL
17 April 2023