कोटेश्वरी मनाई देवी उत्सवानिमित्त “थेट तुमच्या घरातून” नाटकाचा सुवर्ण प्रयोग

खेड (जामगे ) दि १३–
श्री क्षेत्र कोटेश्वरी मनाई मंदिर, खेड (जामगे) येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही देवीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडत आहे. या धार्मिक उत्सवाच्या अनुषंगाने, काल लोकनेते मा. रामदासभाई कदम नाट्यगृह येथे “थेट तुमच्या घरातून” या विनोदी नाटकाचा ५० वा सुवर्ण प्रयोग संपन्न झाला.
या विशेष प्रयोगाला रामदासभाई कदम आणि राज्यमंत्री योगेश कदम कुटुंबीयांसह उपस्थित होते. संपूर्ण परिवारासह हा विशेष प्रयोग त्यांनी अनुभवला.
नाट्यप्रेमी कदम यांच्यासाठी हा क्षण खास होता. शालेय जीवनापासूनच रंगभूमीची आवड असलेल्या योगेश कदम यांनी यापूर्वी एका मुलाखतीत नाट्यकलेबद्दलची आपली जिव्हाळ्याची भावना व्यक्त केली होती. त्या नाट्यप्रेमाचा प्रत्यय काल प्रत्यक्षात आला, जेव्हा त्यांनी हास्यविनोदी नाटकाचा आनंद घेतला व कलाकारांशी संवाद साधत त्यांचे कौतुकही केले.

या प्रसंगी बोलताना राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, “कोकणात जपलेली ही नाट्यपरंपरा आणि उत्सवांचे सामाजिक,सांस्कृतिक योगदान महत्त्वाचे आहे. गावकऱ्यांसाठी आयोजिलेला हा प्रयोग नक्कीच अविस्मरणीय ठरला आहे.”
या प्रसंगी रामदासभाई कदम यांनीही कलाकारांचे अभिनंदन करत कलावंतांनी दिलेले योगदान कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
“कोकणाची नाट्यपरंपरा आणि उत्सवांमधून साकार होणारे सांस्कृतिक क्षण हीच आपल्या गावांची एक ओळख आहे, ती आपण जपली पाहिजे.” असे योगेश कदम यांनी यावेळी सांगितले.
नाटकानंतर त्यांनी रामदासभाई कदम आणि योगेश कदम यांनी कलाकारांशी गप्पा मारत, त्यांच्या कलागुणांना मनःपूर्वक दाद दिली आणि अशा उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन देण्याची ग्वाही दिली.ML/MS