या राष्ट्रांनी केली पॅलेस्टाईनला औपचारिकरीत्या मान्यता देण्याची घोषणा

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गाझा पट्टीवर ताबा मिळवून पॅलेस्टाइनची नाकाबंदी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या इस्रायलला मोठा धक्का बसला. पॅलेस्टाइनला स्वतंत्र देश म्हणून आपण मान्यता देत असल्याची घोषणा नॉर्वे, आयर्लंड आणि स्पेन या देशांनी काल केली . याबाबत औपचारिक मान्यता देण्याची प्रक्रिया २८ मे रोजी होणार आहे. या नाट्यपूर्ण घटनेनंतर इस्रायलने या देशांतील आपल्या राजदूतांना तातडीने मायदेशी बोलावले. पुढच्या आठवड्यात हे देश पॅलेस्टाईनला देश म्हणून मान्यता देण्याची घोषणा करू शकतात.दरम्यान, यामुळे नाराज झालेल्या इस्रायलने या देशांमधील आपल्या राजदूतांना परत बोलावून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
‘हमास’च्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या नागरी वस्तीत गेल्या वर्षी सात ऑक्टोबरला केलेल्या हल्ल्यात बाराशे इस्रायली नागरिक ठार झाले होते, तर अडीचशे नागरिकांना ‘हमास’ने ओलिस ठेवले. या हल्ल्यास प्रत्युत्तर देऊन इस्रायलने पॅलेस्टाइनवर आक्रमण केले. इस्रायलने गाझा पट्टीवर केलेल्या संहारक हल्ल्यात आतापर्यंत सुमारे ३५ हजार पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले आहेत. इस्रायलकडून होणाऱ्या या हल्ल्यांत गाझामधील सर्वसामान्य पॅलेस्टिनींची होरपळ होत असल्याने अमेरिकेसह युरोपीय देशांमध्ये नाराजी पसरली आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यातील रक्तरंजित संघर्ष शिगेला पोहोचलेला असताना दुसरीकडे नॉर्वे, आयर्लंड आणि स्पेनने पॅलेस्टाईनला औपचारिकरीत्या मान्यता देण्याची घोषणा केली आहे. आयर्लंडसारख्या देशाने पॅलेस्टाईनला मान्यता देणे दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासारखे असल्याची टीका इस्रायलचे परराष्ट्रमंत्री काट्ज यांनी केली आहे. याप्रकरणी इस्रायल ठोस पाऊल उचलेल.हा मान्यता देण्याचा निर्णय गाझातील इस्रायलींची घरवापसी आणि युद्धविरामाच्या प्रयत्नांमध्ये बाधा आणू शकतात, असेही काट्ज यांनी म्हटले आहे. जगभरातील तब्बल १४० हून अधिक देशांनी पॅलेस्टाईनला मान्यता दिली आहे; परंतु अनेक युरोपीय देश आणि अमेरिकेने यासाठी विरोध केला आहे. पॅलेस्टाईन संयुक्त राष्ट्रांचा कायम सदस्य बनू शकत नाही म्हणून अमेरिकेने एक पाऊल मागे घेतले आहे, तर भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पॅलेस्टाईनच्या कायम सदस्यत्वासाठी समर्थन दिले आहे.मध्यपूर्वेत शांतता नांदावी असे वाटत असेल तर पॅलेस्टाईनला देश म्हणून मान्यता देण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, असे नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गार स्टोर यांनी म्हटले आहे. पुढच्या आठवड्यात २८ मे रोजी पॅलेस्टाईनला देश म्हणून मान्यता देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
SL/ML/SL
23 May 2024