या भारतीय लेखिकांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार प्रदान

भारतीय लेखिका बानू मुश्ताक आणि अनुवादक दीपा भास्ती यांना त्यांच्या ‘हार्ट लॅम्प’ (Heart Lamp) या लघुकथासंग्रहासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार (International Booker Prize 2025) प्रदान करण्यात आला आहे. ‘हार्ट लॅम्प’मधील कथा कन्नड भाषेत मूळतः लिहिल्या गेल्या आहेत. दक्षिण भारतात सुमारे 6.5 कोटी लोक ही भाषा बोलतात. या कथा 1990 ते 2023 या कालावधीत लिहिल्या गेल्या असून, भास्ती यांनी त्या निवडून त्यांचे संपादन केले आहे. अनुवाद करताना त्यांनी दक्षिण भारताच्या बहुभाषिक आणि सांस्कृतिक विविधतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. हार्ट लॅम्प या संग्रहात 12 कथा आहेत, ज्या गेल्या 30 वर्षांत दक्षिण भारतातील महिलांच्या जीवनातील लढ्यांची आणि अनुभवांची साक्ष देतात.
लंडनच्या टेट मॉडर्न येथे झालेल्या समारंभात बुकर पारितोषिकाचे अध्यक्ष आणि लेखक मॅक्स पोर्टर यांनी विजेत्यांची घोषणा केली. पोर्टर यांनी या अनुवादाच्या ‘क्रांतिकारक’ स्वरूपाचे कौतुक करताना सांगितले की, “या कथा महिलांच्या प्रजनन हक्कांपासून श्रद्धा, जात, सत्ता आणि दडपशाहीपर्यंत अनेक बाबींचा वेध घेतात.”
विशेष म्हणजे, लघुकथासंग्रहाला पहिल्यांदाच हा पुरस्कार मिळाला असून दीपा भास्ती या पहिल्या भारतीय अनुवादक ठरल्या आहेत ज्यांना हा मान प्राप्त झाला आहे. 2016 नंतरच्या नव्या स्वरूपात या पुरस्कारासाठी गौरविण्यात आलेल्या त्या नवव्या महिला अनुवादक ठरल्या, तर बानू मुश्ताक या सहाव्या महिला लेखिका आहेत ज्यांना हा प्रतिष्ठित सन्मान मिळाला आहे.
लेखिका, वकील आणि कार्यकर्त्या असलेल्या बानू मुश्ताक यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, “या कथा धर्म, राजकारण आणि समाजाकडून महिलांकडून मागितल्या जाणाऱ्या अंध वचनबद्धतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, आणि अशा वातावरणात त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांची कथा सांगतात.”
‘हार्ट लॅम्प’ ही दुसरी भारतीय कृती आहे जी इंटरनॅशनल बुकर पुरस्कार जिंकली आहे. याआधी 2022 मध्ये गीतांजलि श्री यांच्या ‘रेत समाधी’ (Tomb of Sand) ला हा पुरस्कार मिळाला होता, ज्याचा अनुवाद डेझी रॉकवेल यांनी केला होता.