शेतात जाण्यासाठी रस्ता नाही,”मला हेलिकॉप्टर घेऊन द्या”
जालना, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): खरीप हंगाम सुरू झाला की शेत रस्त्याची अनेक प्रकरणे पुढे येतात,मात्र शेत रस्ता उपलब्ध करून देता येत नसेल तर शेतात जाण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर घेऊन देण्याची मागणी एका शेतकऱ्याने केली आहे. शेतकऱ्याच्या या अफलातून मागणीने तालुक्यासह जिल्हाभरात या विषयावर चर्चा सुरू झाली आहे.
जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यातील देऊळझरी येथील शेतकरी सुनील जगन्नाथ भोपळे यांनी जाफराबाद तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांची देऊळझरी येथे गट क्रमांक ३५० मध्ये शेती आहे.शेतीच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी त्यांचा शेतरस्ता अडविल्याने सध्या शेतात ट्रॅक्टर किंवा बैलगाडी काहीच नेता येत नाही. यामुळे शेतीची मशागत आणि शेती कशी करावी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे, तेव्हा शासनाने याबाबत लवकर निर्णय घेऊन शेत रस्ता उपलब्ध करून द्यावा, अन्यथा शेतात जाण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर घेऊन द्यावे, अशी मागणी निवेदनाच्या शेवटी करण्यात आली आहे.
शेती करण्यासाठी देऊळझरी येथील एका शेतकऱ्याने चक्क हेलिकॉप्टरची मागणी केली आहे. यामुळे शेतकऱ्याच्या या मागणीवर आता प्रशासन काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.
याबाबत सुनील यांनी स्वतः कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन त्यांनाही सविस्तर अवगत केले आहे. त्यानुसार तलाठ्यामार्फत पंचनामा होऊन याबाबत तहसील कार्यालयात नुकतीच एक सुनावणी पार पडली.पुढील सुनावणीत योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन तहसीलदारानी दिले आहे. माझी हेलिकॉप्टरची मागणी अवास्तव वाटत असली तरी त्याशिवाय मला पर्याय उरलेला नाही.याबाबत प्रशासन लवकरच योग्य तो तोडगा काढेल अशी अपेक्षा असल्याचे सुनील भोपळे व्यक्त करतात.
ML/KA/PGB
9 July 2023