मविआमध्ये जागा वाटपावरून स्पर्धा नाही
मुंबई, दि.२९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील हुकुमशाही मोदी सरकारने काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर राजकीय सुडबुद्धीने कारवाई केली पण राहुल गांधी मोदींच्या हुकुमशाहीला न डगमगता निर्भीडपणे सामोरे गेले. देशभरात भितीचे वातावरण असताना ‘डरो मत’ असा संदेश देणाऱ्या राहुल गांधी यांचा सत्कार छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात करावा, ही काँग्रेसची भावना होती म्हणूनच मुंबईत १ सप्टेंबरला काँग्रेस पक्षाच्या वतीने जननायक राहुल गांधी यांचा भव्य सत्कार केला जाणार आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
दादर येथील टिळक भवन या काँग्रेस कार्यालयात राहुल गांधी यांच्या सत्काराच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर नाना पटोले प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते. ते पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप करुन त्यांची खासदारकी रद्द केली, त्यानंतर त्यांना सरकारी घरही खाली करावयास भाग पाडले पण राहुल गांधी मागे हटले नाहीत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मोदी सरकारला राहुल गांधी यांची खासदारकी बहाल करावी लागली. मोदी सरकारवरील अविश्वासदर्शक ठरावात भाग घेत राहुल गांधींनी मोदी सरकारवर तुफान हल्ला केला.
मणिपूरच्या मुद्द्यावर मोदी सरकारवर तोफ डागली. देशातील हुकुमशाही कारभाराला सडेतोड उत्तर देणाऱ्या राहुल गांधी या काँग्रेसच्या निडर योद्ध्याचा सत्कार १ सप्टेंबरला संध्याकाळी ५ वाजता केला जाणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत.
महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपावरून कोणतीही स्पर्धा नाही वा वादही नाहीत. उद्धव ठाकरे यांनीही मेरिटनुसार जागा वाटप होईल हे स्पष्ट केले असून काँग्रेस पक्षाचीही तीच भूमिका आहे. मोदी सरकारचा पराभव करणे हाच मविआचा उद्देश असून ही आघाडी त्यावर भर देत आहे, असे नाना पटोले यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
ML/KA/SL
29 Aug 2023