कविवर्य नारायण सुर्वे यांच्या घरी चोरी, उपरती झालेल्या चोराने लिहिली भावनिक चिठ्ठी

 कविवर्य नारायण सुर्वे यांच्या घरी चोरी, उपरती झालेल्या चोराने लिहिली भावनिक चिठ्ठी

नेरळ, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कामगार आहे मी तळपती तलवार आहे, सारस्वतांनो थोडा गुन्हा करणार आहे, अशी ललकारी देत कामगार वंचित, शोषितांच्या व्यथांना वाचा फोडणारे कवी असलेले नारायण सुर्वे. आजही या कवीचे केवढे गारूड लोकांच्या मनावर आहे हे सिद्ध करणारा एक रंजक किस्सा समोर आला आहे. दिवंगत नारायण सुर्वे यांच्या नेरळ येथील निवासस्थानी चोरी झाली. मात्र हे कविवर्य नारायण सुर्वे यांचे घर आहे हे लक्षात आल्यावर पश्चात्ताप होऊन चोराने चक्क चोरलेला माल परत केला. तसेच दिलगिरी व्यक्त करणारी भावनिक चिठ्ठी सिद्धा लिहिली.

कवी नारायण सुर्वे यांचं नेरळमध्ये घर आहे. त्या घरात त्यांची मुलगी सुजाता घारे आणि जावाई गणेश घारे राहतात. ते दहा दिवसांसाठी विरारला मुलाकडे गेले होते. यामुळे त्यांच्या घराला कुलूप होते. ही संधी साधून चोराने त्यांच्या घरावर डल्ला मारला. शौचालयाची खिडकी फोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर सलग दोन, तीन दिवस मिळेल ते सामान घेऊन चोर जाऊ लागला. चोराने एलईडी टीव्ही, तांब्या-पितळ्याच्या वस्तू, भांडी आदी साहित्य नेले.

घरात कोणीच नसल्याने चोर रोज येऊ लागला. एका खोलीत त्याला भिंतीवर नारायण सुर्वे यांचा फोटो दिसला. तसेच कविवर्यांना मिळालेले पुरस्कार, स्मृतिचिन्हे, मानपत्रे दिसले. मग हे घर कविवर्य नारायण सुर्वे यांचे असल्याचे त्याला समजल्यावर धक्का बसला. त्याला आपण केलेल्या कृतीचा पश्चात्ताप झाला. त्याच्यातील माणूस जागा झाला. त्याने चोरून नेलेल्या एक, एक वस्तू परत आणून देण्यास सुरुवात केली. टीव्हीसह सर्वच वस्तू आणून ठेवल्या. त्यानंतर आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली. मला माहीत नव्हते की, हे घर नारायण सुर्वे यांचे आहे. नाही तर मी चोरी केली नसती. मला माफ करा. मी, तुमच्या ज्या वस्तू घेतल्या आहेत, त्या परत करत आहेत. मी टीव्ही पण नेला होतो. तो परत आणला. सॉरी…

या घटनेमुळे हा अनोखा चोर आता चांगलाच चर्चेत आला आहे. चोरीपेक्षा चोराने केलेल्या कृतीची चर्चा होत आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. चोराने परत आणलेल्या टीव्हीचे फिंगर प्रिंट तपासण्यासाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले आहे. त्या आधारे तपास सुरू केला आहे.

SL/ML/SL

16 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *