उत्तर कोरियात आईस्क्रीम शब्दावर बंदी

 उत्तर कोरियात आईस्क्रीम शब्दावर बंदी

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन पुन्हा एकदा त्यांच्या अजब-गजब निर्णयामुळे चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी देशात लोकप्रिय असलेल्या ‘आईस्क्रीम’ या इंग्रजी शब्दावर थेट बंदी घातली आहे. त्यांच्या मते, ‘आईस्क्रीम’ हा शब्द परदेशी प्रभाव दर्शवतो आणि त्यामुळे तो उत्तर कोरियाच्या सांस्कृतिक शुद्धतेस बाधा पोहोचवतो. यापुढे या गोड पदार्थाला ‘एसीयुकिमो’ किंवा ‘इयूरियुंबोसेउंगी’ या स्थानिक नावांनी ओळखले जाणार आहे, ज्यांचा अर्थ “बर्फापासून बनवलेली मिठाई” असा होतो.

किम जोंग उन यांची भूमिका स्पष्ट आहे—देशातून दक्षिण कोरियाई आणि पाश्चात्य शब्दांचा प्रभाव पूर्णपणे हटवायचा. त्यांच्या मते, परदेशी पर्यटकांनी उत्तर कोरियात आल्यावर इथल्या संस्कृतीतून काहीतरी शिकून परत जावे, परंतु परदेशी शब्दांचा वापर करून जनतेवर प्रभाव पडू नये. यासाठी पर्यटन क्षेत्रातील गाइड्सना इंग्रजी शब्द टाळण्याचे प्रशिक्षण देणारे विशेष केंद्र सुरू करण्याची तयारीही सुरू आहे.

या निर्णयामुळे उत्तर कोरियातील टूर गाइड्स अडचणीत आले आहेत. एका ट्रेनी गाइडने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “परदेशी पर्यटकांशी संवाद सोपा व्हावा म्हणून आम्ही इंग्रजी शब्द वापरत होतो. पण आता किम जोंग उन यांच्या निर्णयामुळे आमची कोंडी झाली आहे. या आदेशाला विरोध करण्याची हिंमत कुणामध्ये नाही.”

विशेष म्हणजे, ‘एसीयुकिमो’ हा शब्द आर्क्टिक प्रदेशातील लोकांच्या बोलीतून घेतल्याचे सांगितले जाते. मात्र भाषातज्ज्ञांच्या मते, हे नवीन शब्दही प्रत्यक्षात इंग्रजी भाषेवर आधारित आहेत, त्यामुळे किम जोंग उन यांचा निर्णय विरोधाभासी ठरतो. याआधीही उत्तर कोरियात ‘हॅमबर्गर’, ‘कराओके’ यांसारख्या शब्दांवर बंदी घालण्यात आली होती आणि त्यांना स्थानिक पर्याय दिले गेले होते.

किम जोंग उन यांच्या या निर्णयामुळे जगभरात पुन्हा एकदा त्यांच्या कारभाराची खिल्ली उडवली जात असून, उत्तर कोरियातील नागरिक आणि पर्यटन क्षेत्रातील कर्मचारी नव्या संकटात सापडले आहेत.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *