अमेरिकेने रद्द केला ग्रीन कार्ड लॉटरी प्रोग्राम
वॉशिग्टन डीसी, दि. १९ : अमेरिकेने आज ग्रीन कार्ड लॉटरी किंवा डायव्हर्सिटी व्हिसा (DV1) कार्यक्रम रद्द केला आहे. याच्या माध्यमातून अमेरिकेत कमी प्रतिनिधित्व असलेल्या देशांतील लोकांना ग्रीन कार्ड दिले जात असे. भारतीयांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. भारत, चीन, कॅनडा आणि युनायटेड किंगडमसारखे देश यात समाविष्ट नाहीत कारण तेथून आधीच जास्त लोक अमेरिकेत येतात.
हा निर्णय 14 डिसेंबर रोजी ब्राउन युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या गोळीबाराच्या आणि 15 डिसेंबर रोजी मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) युनिव्हर्सिटीमध्ये एका प्राध्यापकाच्या घरी गोळ्या घालून केलेल्या हत्येनंतर घेण्यात आला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दीर्घकाळापासून डायव्हर्सिटी व्हिसा (DV1) कार्यक्रमाला विरोध करत आहेत. त्यांचे म्हणणे होते की, या लॉटरीद्वारे येणारे काही लोक अमेरिकेत सुरक्षा किंवा इतर समस्या निर्माण करू शकतात.
होमलँड सिक्युरिटी सचिव क्रिस्टी नोएम यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या निर्देशानुसार हा लॉटरी कार्यक्रम थांबवण्यात आला आहे जेणेकरून आणखी कोणताही अमेरिकन नागरिक अशा घटनांमध्ये जखमी होऊ नये. त्यांनी आठवण करून दिली की, 2017 मध्ये न्यूयॉर्क शहरात झालेल्या ट्रक हल्ल्यानंतरही ट्रम्प यांनी हा कार्यक्रम रद्द करण्याचा प्रयत्न केला होता.
ग्रीन कार्ड लॉटरी किंवा डायव्हर्सिटी व्हिसा प्रोग्राम (DV1) ही एक अशी प्रणाली आहे, जी दरवर्षी लॉटरीद्वारे अमेरिकेत कमी प्रतिनिधित्व असलेल्या देशांतील लोकांना ग्रीन कार्ड देते. या कार्यक्रमांतर्गत दरवर्षी सुमारे 50,000 लोकांची निवड केली जाते.
ही लॉटरी प्रणाली 1990 मध्ये लागू करण्यात आली होती, जेणेकरून अमेरिकेत विविध देशांतील लोकांना येण्याची संधी मिळावी. 2025 मध्ये या लॉटरीसाठी सुमारे 20 दशलक्ष लोकांनी अर्ज केला होता. यामध्ये विजेत्या लोकांसोबत त्यांचे जोडीदार आणि मुलांनाही समाविष्ट करण्यात आले, ज्यामुळे एकूण 131,000 पेक्षा जास्त लोकांची निवड झाली. त्यांच्या प्राथमिक तपासणीनंतर 50 हजार लोकांची निवड केली जाईल.
SL/ML/SL