सचिनच्या षटकाराच्या अनोख्या शिल्पाचे उद्या होणार अनावरण
मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्या वानखेडे स्टेडीअमवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या एका अनोख्या पूर्णाकृती शिल्पाचे अनावरण होत आहे. शेन वॉर्नला षटकार मारतानाच्या सचिनच्या पोजचे हे शिल्प अहमदनगरचे चित्र शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारले आहे.
सचिनच्या या शिल्पाची उंची 22 फूट आहे. सचिनच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त मुंबई क्रिकेट असोसिएशनने ही अनोखी भेट त्याला आणि त्याच्या चाहत्यांना दिलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या शिल्पाचे लोकार्पण होईल
ब्रांझपासून तयार करण्यात आलेल्या या शिल्पाची एकूण उंची 22 फूट असेल. त्यात सचिनच्या मुख्य पुतळ्याची उंची 10 फूट, तर त्याच्या हातातील बॅटची उंची 4 फूट आहे.
अहमदनगरचे चित्र-शिल्पकार प्रमोद कांबळी यांनी या अनुपम शिल्पाची निर्मिती केलीय. त्यांनी अयोध्येतल्या राम मंदिराचे कामही केलेय. विशेष म्हणजे कांबळे यांचे सचिनशी जुने संबंध आहेत. या कलाकृतीच्या निर्मितीसाठी या दोघांची पुन्हा एकदा भेट झाली. अहमदनगर येथील स्टुडिओमध्ये कांबळे यांनी आठ महिन्यात हे शिल्प साकारले. सचिनचा भाऊ अजितने त्यांना या कामासाठी तेंडल्याचे अनेक बारकावे सांगितले. यासाठीचा क्ले, साहित्य चक्क जपानहून मागवल्याचे समजते.
सचिन तेंडुलकरने 1998 वानखेडे येथे पहिला रणजी सामना खेळला. त्यामुळे सचिनच्या आवडीचे हे ठिकाण आहे. या ठिकाणच्या त्याच्या खूप आठवणी असून, वानखेडेवर शिल्प उभारणे हे आपल्यासाठी मोठी गोष्ट असल्याची प्रतिक्रिया यापूर्वीच सचिनने दिली होती. 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरच खेळला गेला. या सामन्यात भारताने श्रीलंकेला धूळ चारली. विश्वचषक जिंकणारा भारत पहिला यजमान संघ ठरला. याआधी कोणत्याही संघाने स्वतःच्या भूमीवर विश्वचषक जिंकला नव्हता.इथेच सचिन तेंडुलकरचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले.
SL/KA/SL
31 Oct. 2023