या राज्यात आजपासून समान नागरी संहिता लागू

डेहराडून, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तराखंडात आजपासून समान नागरी संहिता लागू झाली आहे. समान नागरी संहिता (UCC) लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, समान नागरी संहितेच्या अंमलबजावणीमुळे समाजात एकरूपता येईल. राज्यातील सर्व नागरिकांना समान अधिकार आणि जबाबदाऱ्या असतील. ते म्हणाले की, उत्तराखंड हे स्वतंत्र भारताचे पहिले राज्य ठरले आहे, जिथे हा कायदा लागू झाला आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी याची घोषणा केली. हा कार्यक्रम मुख्यमंत्री निवासस्थानातील मुख्य सेवक सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
मुख्यमंत्री धामी म्हणाले की, आम्ही 3 वर्षांपूर्वी जनतेला दिलेले वचन पूर्ण केले आहे. यूसीसी कोणत्याही धर्माच्या किंवा वर्गाच्या विरोधात नाही. त्याचा उद्देश कोणालाही लक्ष्य करणे नाही. सर्वांना समान अधिकार दिले पाहिजेत. 27 जानेवारी हा दिवस समान नागरिकत्व दिन म्हणून साजरा केला जाईल. धामी म्हणाले की, यूसीसीच्या अंमलबजावणीमुळे हलाला, बहुपत्नीत्व आणि तीन तलाकवर पूर्णपणे बंदी घालण्यात येईल. यावेळी धामी यांनी समान नागरी संहिता उत्तराखंड-2024 च्या अंमलबजावणीवरील नियम आणि पोर्टलचे उद्घाटन केले. https://ucc.uk.gov.in हे पोर्टल सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले आहे. यावर या कायद्याबाबत पूर्ण माहिती देण्यात आली आहे.
SL/ML/SL
27 Jan. 2025