तब्बल १८ कॅरेट सोन्याच्या टॉयलेटची चोरी

लंडन, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आधुनिक जगात आपल्या रोजच्या वापरात अत्याधुनिक आणि महागड्या वस्तू वापरण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. हौसेला मोल नाही असं म्हणतात. इंग्लंडच्या वूडस्टॉक, ऑक्सफर्डशायर या ३०० वर्षांहून अधिक जुन्या घरात असलेल्या ब्लेनहाइम पॅलेसमध्ये तब्ब्ल ४८ लाख पौंड म्हणजे अंदाजे ५०,५४,३४,५६१.१२ रुपये किमतीचे सोन्याचे टॉयलेट हे प्रदर्शनाचा एक भाग म्हणून लावले होते. परंतु, एका चोराने चक्क चालू अवस्थेतील ते टॉयलेट प्रदर्शनाच्या ठिकाणाहून चोरून नेले होते. नंतर त्याने त्या चोरीची कबुलीदेखील दिली आहे, अशी माहिती ‘द गार्डियन’च्या अहवालावरून मिळते. ते टॉयलेट सप्टेंबर २०१९ सालच्या प्रदर्शनाचा एक भाग होते.
‘अमेरिका’ नावाचे हे तब्बल ५० कोटीं रुपयांचे आलिशान कमोड, इटलीच्या प्रसिद्ध मॉरिझिओ कॅटेलन नावाच्या एका वैचारिक कलाकाराने तयार केले होते. ब्लेनहाइम पॅलेस युनायटेड किंग्डमचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचे जन्मस्थान असल्याने त्या जागेला एक ऐतिहासिक महत्त्व आहे.
सोन्याचा टॉयलेट चोरणाऱ्या या चोराचे नाव जेम्स जिम्मी शीन, असे आहे. त्याने न्यायालयात घरफोडी आणि चोरी केलेला माल हाताळल्याची कबुली दिली आहे. मात्र, त्या चोराने जे सोन्याचे टॉयलेट चोरले होते, ते प्रदर्शनादरम्यान प्लम्बिंग करून वापरण्याजोगे करण्यात आले होते. त्यामुळे ते टॉयलेट चोरून नेताना योग्य रीतीने काढले न गेल्याने संपूर्ण प्रदर्शनात पाणी साचून वूडस्टॉकच्या १८ व्या शतकातील राजवाड्याचे भरपूर नुकसान झाले, अशी माहिती ‘न्यूज आउटलेट’च्या अहवालावरून मिळते. शीनला हॉर्स रेसिंग संग्रहालयातील इतर अनेक वस्तूंच्या चोरीसाठी आधीच १७ वर्षांची शिक्षा झाली आहे.
SL/ML/SL
5 April 2024